जिल्ह्यातील २५६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:02+5:302021-01-13T04:58:02+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कामकाज बंद असलेल्या संस्था अवसायनात काढण्याचा धडाका सहकार विभागाने लावला आहे. ...

Registration of 256 co-operative societies in the district canceled | जिल्ह्यातील २५६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

जिल्ह्यातील २५६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

Next

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील कामकाज बंद असलेल्या संस्था अवसायनात काढण्याचा धडाका सहकार विभागाने लावला आहे. त्यातूनच २५६ संस्थांना नोंदणी रद्द बाबतच्या नोटीसा लागू केल्या असून तिथे अवसायकांची नेमणूक केली आहे. सर्वाधिक ५८ संस्था पन्हाळा तालुक्यातील आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले आहे. विकास, दूध, पतसंस्थांबरोचर गृहनिर्माण, पाणीपुरवठा, औद्योगिक संस्थांची संख्याही लक्षणीय आहे. संस्थांमध्ये तालुक्यातील राजकारण अडकले असल्याने ज्याकडे संस्था अधिक त्याचेच तालुक्यावर वर्चस्व असते. त्यामुळे आपापल्या गटाच्या संस्था वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतो. त्यातूनच संस्थांची संख्या वाढत गेली.

जिल्हा बँक व ‘गोकुळ’ दूध संघांचे राजकारण या संस्थांवरच असल्याने पिशवीतील (प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या) संस्थांची संख्या वाढली आहे. युती शासनाच्या काळात सहकार विभागात स्वच्छता माेहीम राबविली होती. ज्या संस्था प्रत्यक्षात कार्यरत आहेत, त्यांचीच नोंदणी कायम ठेवून उर्वरित संस्था अवसायनात काढल्या होत्या. यामध्ये जिल्ह्यातील हजारो संस्था अवसायनात काढल्या. आताही सहकार विभागाने संस्थांची तपासणी करून क्रियाशील नसलेल्या संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुका उपनिबंधक व सहायक निबंधकांनी संस्था अवसायनात काढल्या आहेत. संबंधित संस्थांना नोटिसा लागू केल्या असून अवसायकांचीही नेमणूक केली आहे. अवसायनात काढलेल्या संस्थांमध्ये हातकणंगले, पन्हाळा, कागल व करवीर तालुक्यातील संस्थांचा समावेश अधिक आहे. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत दुग्ध विभागाने ४५० दूध व मत्स्य संस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यातील बहुतांशी दूध संस्था आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर झटका

जिल्हा बँक व ‘गोकुळ’सह साखर कारखान्यांच्या निवडणुका आहेत. दूध संस्था ‘गोकुळ’च्या तर विकास, पत, पाणीपुरवठासह इतर संस्था जिल्हा बँकेच्या प्राथमिक सभासद आहेत. या दोन्ही शिखर संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्याच्या तोंडावरच सहकार विभागाने झटका दिला आहे.

तालुका अवसायनातील संस्था

कोल्हापूर शहर २०

करवीर २९

गडहिंग्लज १५

आजरा ४

भुदरगड १५

चंदगड २

शाहूवाडी ६

राधानगरी १५

पन्हाळा ५८

गगनबावडा ०

हातकणंगले ५०

शिरोळ ७

कागल ३५

---------------------------

एकूण २५६

Web Title: Registration of 256 co-operative societies in the district canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.