‘किसान सन्मान’साठी कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:44 AM2019-07-01T11:44:33+5:302019-07-01T11:48:04+5:30
कोल्हापूर : सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही ...
कोल्हापूर : सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही प्रक्रिया थांबविण्यासाठी सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत, तसेच नोंदणीची वेबसाईट अद्याप खुलीच असल्याने नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार आहे. रविवारपर्यंत योजनेच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यात ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली.
सरकारने या योजनेसाठीची पूर्वीची दोन हेक्टरची अट शिथील केली आहे. या नवीन धोरणानुसार रविवारपर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांची आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली आहे. अट शिथील करण्यापूर्वीची नोंदणी दोन लाख ९५ हजार ९७४ इतकी होती. त्यामध्ये या नवीन आकडेवारीची भर पडत आहे.
सरकारने या योजनेची नोंदणी जूनअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाकडून यंत्रणा गतिमान करून युद्धपातळीवर नोंदणीचे काम सुरू आहे. उद्दिष्टाप्रमाणे रविवारी शेवटचा दिवस असला, तरी अद्याप नोंदणीसाठी पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे काम सुरू आहे. सरकारकडून नोंदणीसाठीची वेबसाईट रविवारी रात्रीपर्यंत बंद करण्यात आली नव्हती; त्यामुळे जोपर्यंत ही वेबसाईट खुली आहे, तोपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
‘किसान सन्मान’ची नोंदणी
तालुका शेतकरी नोंदणी
- आजरा १५१८
- गगनबावडा ७७४
- भुदरगड १६०३
- चंदगड २७३१
- गडहिंग्लज ३४९६
- हातकणंगले ६७००
- कागल २०३४
- करवीर ५५७९
- पन्हाळा ४२५१
- राधानगरी २१९३
- शाहूवाडी ३५९४
- शिरोळ २८३९
एकूण ३७,३१२
‘किसान सन्मान’च्या नोंदणीसाठी सरकारने ३० जूनपर्यंतचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही नोंदणी थांबविण्याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत. तसेच नोंदणीची वेबसाईटही अद्याप खुली आहे; त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहील.
- संजय शिंदे,
निवासी उपजिल्हाधिकारी