मुद्रांकचे सर्व्हर डाउन; दस्त नोंदणी झाली ठप्प, लोकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:12 PM2023-08-11T12:12:28+5:302023-08-11T12:12:56+5:30
कोल्हापुरात रोज कोटीच्या महसुलावर पाणी
पोपट पवार
कोल्हापूर : खरेदी-विक्री, तारण, दस्त नोंदणी, हक्कसोड ही कामे करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात रोज रांग लागलेली असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे संकेतस्थळच प्रचंड संथगतीने सुरू असल्याने हे दस्त नोंदणीसह जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार, कार्यालयीन प्रक्रिया ठप्प झाली. या सर्व्हर डाउनमुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात रोज एक कोटी रुपयांच्या महसुलावर प्रशासनाला पाणी सोडावे लागत आहे. विशेष म्हणजे राज्यभरात ही समस्या असूनही सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही.
मुद्रांक विभागाचे राज्याचे कार्यालय पुण्यात आहे. सरकारने एनआयसी या कंपनीला ऑनलाइन दस्त नोंदणीचे काम दिले आहे. मात्र, त्यांचे संकेतस्थळ अनेकदा संथ चालत असल्याने जमिनीची खरेदी-विक्री, दस्त नोंदणी करण्यास अडचणी येतात.
कोल्हापूर जिल्ह्यात रोज ३००हून अधिक प्रकरणांची नोंदणी होते. यातून एक कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, बुधवारपासून हे संकेतस्थळ धिम्या गतीने सुरू आहे. गुरुवारीही हीच परिस्थिती राहिल्याने नागरिकांचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेक नागरिक सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर थांबून होते.
कर्मचारी-अधिकारी म्हणतात ‘वर’ बोला
सर्व्हर डाउनमुळे कोणतेच खरेदी-विक्रीचे व्यवहार, दस्त नोंदणी बंद असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे. ही कामे करण्यासाठी आलेले अनेक नागरिक संकेतस्थळ सुरू होईल, या आशेने कार्यालयाबाहेर दिवस ठाण मांडून बसत आहेत. अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ही समस्या वरूनच आहेत, अशी त्रोटक उत्तरे दिली जात आहेत. नागरिक जास्तच आक्रमक झाल्यानंतर तुम्हीच वर बोला, असे सांगून हात झटकले जात आहेत.
वारंवार ही समस्या
गेल्या काही दिवसांपासून नोंदणी व मुद्रांकचे सर्व्हर अचानक डाउन होत असल्याने नागरिकांची गैरसाेय होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे.