Corona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 12:31 PM2021-05-12T12:31:19+5:302021-05-12T12:33:10+5:30
Corona vaccine Kolhapur : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्याबाबतची ऑनलाईन अपॉइंटमेंट (तारीख, वेळ) घेण्याची प्रक्रिया कधी सकाळी नऊ, दुपारी एक अशी वेगवेगळ्या वेळी सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच ती हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा अनुभव कोल्हापुरातील नागरिकांना येत आहे. लस घेण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेण्यात या नागरिकांची दमछाक होत आहे.
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्याबाबतची ऑनलाईन अपॉइंटमेंट (तारीख, वेळ) घेण्याची प्रक्रिया कधी सकाळी नऊ, दुपारी एक अशी वेगवेगळ्या वेळी सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच ती हाऊसफुल्ल दाखवित असल्याचा अनुभव कोल्हापुरातील नागरिकांना येत आहे. लस घेण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेण्यात या नागरिकांची दमछाक होत आहे.
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने दि. १ मे पासून पुढील सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. या वयोगटातील ११,८५२ नागरिकांचे सोमवार (दि. १०) पर्यंत लसीकरण झाले आहे. या गटातील नागरिकांनी लस घेण्याच्या किमान एक दिवस आधी कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार या वयोगटातील नागरिक नोंदणीसह अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कधी सकाळी नऊ वाजता, कधी अकरा, कधी दुपारी एक, तर कधी पावणेचार वाजता या पोर्टलवर अपॉइंटमेंट घेण्याचा स्लॉट खुला होत आहे.
पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, लसीकरणाचे केंद्र टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच बुक्ड अशा संदेशासह अपॉइंटमेंट हाऊसफुल्ल झाल्याचे दाखवित आहे. काही नागरिकांनी रात्री अकरा, बारानंतर, तर काहींनी सकाळी सहा, सात वाजता वेगवेगळ्या वेळी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळविण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना ती मिळालेली नाही. त्यामुळे लस घेण्याबाबतच्या अपॉइंटमेंट मिळविण्यासाठीचा मनस्ताप नागरिकांना होत आहे.
- १८ ते ४४ वयोगटातील किती जणांचे झाले लसीकरण : ११,८५२
- १८ ते ४४ वयोगटातील जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या : १८,५२,३६८
- १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झालेल्यांची टक्केवारी : एक टक्का
सकाळी नऊ वाजता राहा तयार
केंद्रनिहाय उपलब्ध डोसची पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर अपॉइंटमेंटचा स्लॉट दिसतो. सर्वसाधारणपणे सकाळी नऊ वाजता स्लॉट खुला होतो. त्यामुळे यावेळेपासून नागरिकांनी लॉगईन व्हावे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर शेड्युलमध्ये सेंटर निवडून अपॉइंटमेंट मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.