चिपळुणात होणार पक्ष्यांची नोंदणी
By Admin | Published: June 4, 2015 11:20 PM2015-06-04T23:20:32+5:302015-06-05T00:20:07+5:30
सह्याद्री निसर्ग मित्र : दहा पक्षीमित्रांची टीम
उत्तमकुमार जाधव-- चिपळूण सह्याद्री निसर्गमित्र संस्थेतर्फे पक्ष्यांचा अभ्यास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २० जून रोजी सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. वर्षभर हा कार्यक्रम राबवला जाणार असून, शहरात दर १५ दिवसांनी १० पक्षीमित्रांची टीम सर्वेक्षण करुन त्याची नोंद ठेवणार आहे.
सध्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, नव्या पिढीला पक्ष्यांची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने सह्याद्री निसर्गने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ग्लोबल टुरिझम आॅफ चिपळूण, आरोही निसर्गमित्र, वनविभाग यांनीही सहभाग दर्शवला आहे. चिपळूण शहरात कुठल्या काळात कोणते पक्षी दिसू शकतात, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर याबाबतची पुस्तिका तयार करण्यात येणार असून, वेबसाईट, ब्लॉग, डीव्हीडी या स्वरुपात ही माहिती उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमात नवोदितांपासून तज्ज्ञ पक्षी निरीक्षक सहभागी करुन घेतले जाणार आहेत. या प्रकल्पाची जबाबदारी सह्याद्रीने घेतली आहे. तांत्रिक बाजूची जबाबदारी ऋतुजा खरे सांभाळणार आहेत. नवोदितांना हा अभ्यास कसा करावा, याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यासाठी पहिली कार्यशाळा १४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संस्थेच्या मार्कंडी येथील कार्यालयात होणार आहे. चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. चिपळुणातील पाणथळही नष्ट होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येथील पक्ष्यांची काय स्थिती आहे. त्यांना कोणते धोके आहेत, हे पाहाणे गरजेचे आहे. याबाबत चौथ्या पक्षीमित्र संमेलनात हा अभ्यास करण्याची गरज ऋतुजा खरे यांनी बोलून दाखवली. भाऊ काटदरे व सर्व पक्षी मित्रांनी हे काम पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. याबाबत पहिली सभा झाली. यावेळी २५ सभासद उपस्थित होते. काटदरे, राम रेडीज, समीर कोवळे, रोहन लोवलेकर, सुभाष केळकर, भक्ती पेंडसे, नितीन नार्वेकर, प्राजक्ता ओक, अनिकेत बापट, खरे, अक्षय बापट यावेळी उपस्थित होते. पक्षी नोंदणीतून सध्या परिस्थिती समोर येईल.
सह्याद्री निसर्गमित्रने यंदा दर पंधरा दिवसांनी केल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षणाकडे शहरातील पक्षीमित्रांचे लक्ष लागले आहे. या उपक्रमात नवोदितांपासून तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक सहभागी होणार आहेत. तांत्रिक बाजूने ही जबाबदारी खरे यांनी स्विकारल्याचे सांगण्यात आले.
यानिमित्ताने पक्षीमित्रांना कोकणात पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली असून, शहरातील पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. सह्याद्री निसर्ग मित्रने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
सह्याद्री निसर्गमित्र उलगडणार चिपळूणचे पक्षी वैभव.
सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० पासून प्रारंभ.
१५ दिवसांनी पक्षी मित्रांची टीम करणार सर्वेक्षण.
वेबसाईट, ब्लॉग, डीव्हीडी स्वरुपातही माहिती उपलब्ध होणार.