सहकार संस्थांची नोंदणी मार्चअखेर आॅनलाईन
By admin | Published: June 14, 2015 01:51 AM2015-06-14T01:51:53+5:302015-06-14T01:51:53+5:30
चंद्रकांत दळवी : चुकीच्या कारभाराला आळा घालणार
कोल्हापूर : राज्यातील सहकार विभागाचा कारभार गतिमान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सहकारी संस्थांची नोंदणी मार्चअखेर आॅनलाईन करणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
दळवी म्हणाले, सध्या ई-सहकारच्या वेबसाईटवर गेल्यास राज्यातील सहकारी संस्थांची प्राथमिक माहिती मिळू शकते. मात्र सहकार कायद्यानुसार देणे बंधनकारक असलेले प्रत्येक संस्थांचे सहा अहवालही आॅनलाईन घेण्यात येणार आहेत. दोन वर्षांतून एकदा संस्थांची तपासणी झालीच पाहिजे, असे नियोजन केले आहे. जिल्हा पातळीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यास तपासणीसाठी संस्थांचे उद्दिष्ट दिले आहे. कोणत्याही संस्थेत एकाच दिवशी चुकीचा कारभार व अनियमितता होत नाही. अनेक दिवसांपासून हे सुरू असते. पुढे कधीतरी अती झाल्यानंतर संस्था अडचणीत येते. त्याला आळा घालण्यासाठी सर्वच संस्थांच्या लेखापरीक्षणावर लक्ष देणार आहे.
सहकार कायदा ८३ व ८८ नुसार संस्थांची चौकशी अनेक वर्षे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कलमाखाली १ एप्रिल २०१५ पर्यंत राज्यातील ज्या संस्थांची चौकशी सुरू आहे, त्या सर्व संस्थांची चौकशी मार्च २०१६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई होईल.
गैरकारभार झालेल्या संस्थांवर सहा महिन्यांसाठीच प्रशासक नेमावेत, असा नियम आहे. मात्र अनेक संस्थांवर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रशासक असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांत झालेला गैरकारभार दुरुस्त करून कार्यभार पुन्हा संबंधित संचालकाकडे द्यावा, असा आदेश काढला आहे. चुकीचा कारभार किंवा गैरव्यवहारामुळे बँकांचे विलीनिकरण होत असते. अशावेळी मूळ संस्थेत चुकीचा कारभार करणाऱ्या दोषींवरील कारवाई टाळता येत नाही. कारवाई होणारच आहे. कर्जमाफी घेतलेल्या अपात्र लाभार्र्थ्यांची चौकशी झाली आहे. अहवाल शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून माझ्या कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)
१९ रोजी सहकार पुरस्कार वितरण
सहकारमहर्षी, सहकार भूषणसह ५४ सहकारी संस्थांमधील पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत हे पुरस्कार सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील जाहीर करतील. १९ जून रोजी मुस्कान लॉनवर कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, असेही दळवी यांनी सांगितले. दरम्यान, दळवी यांनी मुस्कान लॉनची पाहणी केली.