गणेशोत्सव मंडळांची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:33+5:302021-08-28T04:27:33+5:30
कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या १४ दिवसांवर आल्याने धर्मादाय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी सुरू करण्यात आली ...
कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या १४ दिवसांवर आल्याने धर्मादाय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त श. ल. हेर्लेकर यांनी शुक्रवारी दिली.
करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा व राधानगरी तालुक्यांसाठी सहायक धर्मादाय आयुक्त रु. र. कोरे यांची तर शिरोळ, भुदरगड, गगनबावडा, कागल, हातकणंगले व आजरा तालुक्यांसाठी व्ही.डी. भोसले हे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आता सर्वत्र उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. हा उत्सव व्यवस्थित पार पडावा यासाठी विविध प्रशासनाकडूनदेखील नियोजन सुरू आहे. सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नोंदणी करावी लागते. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड तसेच ओळखपत्र, मागील आणि या वर्षाचे हिशोब व या वर्षाचे अंदाजपत्रक गेल्यावर्षी देण्यात आलेल्या परवानगीची प्रत, नव्याने नोंदणी करत असल्यास नगरपालिका, ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र व कोरोना नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र मंडळांनी देणे आवश्यक आहे.
----