कोल्हापुरातील ३५ बांधकाम व्यावसायिकांना महारेराचा दणका, नोंदणी केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:56 PM2024-06-12T12:56:08+5:302024-06-12T12:56:28+5:30
अधिकृत संकेतस्थळावर केली नाही माहिती अपलोड
कोल्हापूर : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकारणाने (महारेरा) कोल्हापुरातील नोंदणीकृत ३५ बांधकाम व्यावसायिकांना कारवाईचा दणका दिला आहे. कायद्यानुसार ‘महारेरा’कडे नोंदणी असलेल्या गृह प्रकल्पाची सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून माहितीच भरलेली नाही, म्हणून ‘महारेरा’ने ही कारवाई केली आहे. जोपर्यंत ही माहिती अपलोड केली जात नाही तोपर्यंत नोंदणीचे नियमितीकरण होणार नाही.
बांधकाम क्षेत्रातील फसवणुकीचे प्रकार रोखले जावेत आणि या व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणून महाराष्ट्र रिअर इस्टेट नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्याचे स्वतंत्र कायदे सुद्धा अमलात आले आहेत. या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अर्ज केलेल्या ७६७ पैकी ७४६ गृह प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या सर्व गृह प्रकल्पांची प्रत्येक तीन महिन्यांनी सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी भरायची असते.
गृह प्रकल्पाचे बांधकाम कधी सुरू झाले, तो कधी पूर्ण होणार आहे. त्यामधील सदनिकांची विक्री तसेच शिल्लक सदनिकांची माहिती भरली जाते. त्यामुळे सदनिका घेणाऱ्या ग्राहकाला योग्य माहिती मिळते आणि त्याची फसवणूक होत नाही. अशी माहिती अपलोड करणे कायद्यानेच बंधनकारक करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील ३५ गृह प्रकल्पांची सद्य:स्थिती दर्शविणारी माहिती संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी भरलेली नाही. ‘महारेरा’कडून त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही माहिती अपलोड केली नाही, म्हणून महारेराला कायद्याचा बडगा उगारून त्यांच्यावर नोंदणी रद्दची कारवाई करणे भाग पडले. जोपर्यंत ही माहिती अपलोड केली जाणार नाही तोपर्यंत नोंदणीचे नियमितीकरण केले जाणार नाही. त्यामुळे सदनिका विक्रीही करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
माहिती अपलोड न करणे हा काही गंभीर अपराध नसला तरी बांधकाम व्यावसायिकांनी एकदा नोंदणी केल्यानंतर पुढील व्यवहार कायद्याला अनुसरून करावे, असे अपेक्षित आहे. काही कारणांनी माहिती अपलोड करण्याचे राहून जाते. त्यामुळे पुढील काळात गृह प्रकल्पांची माहिती अद्ययावत करून नोंदणीचे नियमितीकरण करता येऊ शकते.
- कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत गृह प्रकल्प - ७४६
- रेराकडे प्राप्त तक्रारींची संख्या - ५८
- नोंदणीकृत प्रकल्पांना आदेश प्राप्त - ३८
- नोंदणीकृत एजंटांची संख्या - १२१