Kolhapur News: बोगस बांधकाम कामगारांना दणका, नोंदणी रद्द होणार; कॅगच्या तपासणीनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:14 PM2023-01-06T13:14:39+5:302023-01-06T13:14:59+5:30
ग्रामसेवकांकडूनही दाखला देण्यास नकार
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी कॅगकडून (महालेखापरीक्षक) गेल्या महिन्यात झाल्यानंतर आता बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रद्दची प्रक्रिया कामगार कार्यालयातून सुरू झाली आहे. तुमच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात येत आहे, असा संदेश बोगस बांधकाम कामगारांना येत आहेत. दरम्यान, तपासणीत किती बांधकाम कामगार बोगस आढळून आले, यासंबंधीची गोपनीयता शासकीय यंत्रणेतर्फे ठेवण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली. त्यांनी राज्य, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला. यामुळे गेल्या महिन्यात कॅगच्या पथकाने अधिक संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी केली. चौकशीत बांधकाम कामगारांनी ग्रामसेवक, अभियंत्यांनी दिलेल्या दाखल्यांची छाननी करण्यात आली. छाननीत अभियंत्यांनी दिलेल्या दाखल्यावर कॅगने आक्षेप नोंदवले.
परिणामी एकाच अभियंत्याने बहुसंख्य दाखले दिलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी धोक्यात आली आहे. त्यांना तुम्ही जोडलेला दाखला नोंदणीकृत शासनमान्य अभियंत्यांकडून घेतलेला नाही. अर्जात त्रुटी राहिल्या आहेत. यामुळे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी रद्द होत आहे, असा संदेश अनेक बांधकाम कामगारांना येत आहेत. यामुळे बांधकाम कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रामसेवकांकडूनही दाखला देण्यास नकार
बांधकाम कामगार नोंदणीतील बोगसगिरी उघड झाल्यानंतर अनेक गावांतील ग्रामसेवक ताकही फुंकून पित आहेत. ते खरोखर बांधकाम कामगार असलेल्यांनाही दाखला देण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी आहेत.