कारखानदारांनी सुरक्षेचे नियमित आॅडिट करावे

By admin | Published: March 10, 2016 01:37 AM2016-03-10T01:37:10+5:302016-03-10T01:38:22+5:30

राधाकृष्णन बी. : चिपळुणात औद्योगिक सुरक्षा रॅलीला उत्तम प्रतिसाद

Regular audits of safety by the factories | कारखानदारांनी सुरक्षेचे नियमित आॅडिट करावे

कारखानदारांनी सुरक्षेचे नियमित आॅडिट करावे

Next

चिपळूण / शिरगाव : प्रत्येक कारखानदाराने आपले सुरक्षा आॅडिट करुन त्यात असणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. पर्यावरण संरक्षण व इतर बाबींवर चर्चा व्हायला हवी, वैयक्तिक सुरक्षा महत्त्वाची आहे. कामगार सुरक्षित असेल, तर तो कारखाना सुरक्षित ठेवेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
चिपळूण येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, लोटे परशुराम म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुपतर्फे आलेल्या सुरक्षा रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी काढण्यात आलेल्या सुरक्षापत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपआयुक्त आर. पी. खडमकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे संचालक ए. एम. अवसरे, सहाय्यक संचालक एस. आर. दोरूगडे, ए. एम. मोहिते, पी. आर. डेरे, ए. आर. घोगरे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, लोटे परशुराम औद्योगिक उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, हेमंत डांगे, विश्वास खाडीलकर, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी सुरक्षा प्रतिज्ञाही घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले, कंपनीत रस्त्यावर अथवा कोणत्याही स्थळी अपघात घडतात. त्यावेळी सर्वांनाच मदत करावयाची असते. पण, प्रासंगिक काय करणे अत्यावश्यक आहे, याची परिपूर्ण माहिती नसल्याने मदतकार्य दिशाहीन ठरते. यासाठी अपघात टाळण्यासाठीचे व अपघातानंतरचे कर्तव्य समजण्यासाठी सुरक्षा प्रशिक्षण काळाची गरज आहे. औद्योगिक सुरक्षा रॅली शून्य अपघात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिशादायी ठरेल. आर. पी. खडमकर यांनी प्रास्ताविक केले. लोटे परशुराम म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप व औद्योगिक सुरक्षा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमस्थळी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील कंपन्यानी आपल्या सुरक्षा प्रतिनिधींसह दीड हजार कामगार कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुरक्षारथासह हजेरी लावली. (प्रतिनिधी)


औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयतर्फे चिपळूणमध्ये कोल्हापूर विभागाची भव्य रॅली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरक्षापत्रिकेचे प्रकाशन व रॅलीचे उद्घाटन.
यावेळी उपस्थितांना सुरक्षा शपथ देण्यात आली.
कार्यक्रमस्थळी विविध कंपन्यांचे सुरक्षाविषयीचे चित्ररथ लक्ष वेधत होते.
कोल्हापूर येथील घाडगे-पाटील कंपनीच्या कामगारांची वारकरी दिंडीने धमाल उडवली.
कामगारांनी यावेळी सुरक्षाविषयी पोवाडे व नाट्यकृती सादर करुन जनजागृती केली.
चिपळूण बाजारपेठेत निघालेली रॅली लक्षवेधी.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश.


विभागासाठी घेतलेल्या स्पर्धेत बेस्ट कामगार म्हणून ४० स्पर्धक सहभागी झाले होते. अरुण ठसाळे (एक्सल, लोटे), प्रशांत किरकिरे (हिंदुस्थान लिव्हर, लोटे), सुरेश खेडेकर (एक्सल, लोटे) यांचा गौरव करण्यात आला. बेस्ट अधिकारी सुभाष बेंडखळे (घरडा, लोटे), परशुराम भादवणकर (दाऊअ‍ॅग्रो, लोटे), सुनील चौघुले (हिंदुस्थान लिव्हर, लोटे) यांना गौरविण्यात आले.


एखादा आपत्तीजनक प्रसंग ओढवला तर चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व ग्रुपना गौरविण्यात आले. त्यामध्ये जयवंत पाटील (रेमंड, कोल्हापूर), भरत बजागे (एक्सल, लोटे), संजय चव्हाण (एक्सल, लोटे), एचपीसीएल मिरज हजारवाडी ग्रुप, शाहू पाटील (कोल्हापूर), जयवंत बागल (विनती, लोटे) यांचा समावेश होता.


सकाळी ९ वाजल्यापासून चिपळूण भोगाळे येथील भरगच्च सभामंडपात घरडा केमिकलचे जे. के. पाटील व सहकाऱ्यांनी वाद्यवृंदासह अनेक सुरक्षा प्रबोधनपर गीते सादर केली, तर विनतीच्या कर्मचाऱ्यांनी अपघाताला कारणीभूत पार्टी एक अपघात ही एकांकिका सादर केली.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी झेंडा दाखवून व सुरक्षाज्योत श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करुन रॅलीला शुभारंभ केला. यावेळी फुग्याची सजावट केलेली गाडी रॅलीच्या अग्रभागी होती. रॅलीतील घाडगे-पाटील कोल्हापूर यांची वारकरी दिंडी लक्षवेधी ठरत होती. या दिंडीत त्यांनी अभंग व फुगड्या सादर केल्या.

व्यासपीठाच्या खाली राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, आरोग्य सभापती आदिती देशपांडे, नगरसेवक राजेश कदम, बरकत वांगडे, शशिकांत मोदी, मिलिंद कापडी, तहसीलदार वृषाली पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजकांनी त्यांची दखल घेतली नाही, याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Regular audits of safety by the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.