पुनर्वसनासाठी जमिनीचा आजपासून शोध घेणार
By admin | Published: April 19, 2015 11:46 PM2015-04-19T23:46:54+5:302015-04-20T00:23:08+5:30
तीन तालुक्यांतील तलाठी, मंडल निरीक्षक, वन विभागाचे कर्मचारी शासकीय जमिनीची पाहणी करणार आहेत
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या पर्यायी शासकीय जमिनीचा शोध आज, सोमवारपासून घेतला जाणार आहे. वन विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडल निरीक्षक, अभयारण्यग्रस्तांचे प्रतिनिधी जमिनीची पाहणी करणार आहेत.
गेल्या १६ मार्चपासून योग्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी चांदोलीचे अभयारण्यग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. याची दखल घेऊन वन सचिव विकास खारगे यांनी पुनर्वसनासाठीच्या जमिनीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी दुपारी स्थानिक वन अधिकारी एन. ए. पाटील यांनी आंदोलकांच्या नेत्यांची भेट घेतली. आजपासून शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यांतील शासकीय जमिनीची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासाठी लागणारी जमीन व तीन तालुक्यांत किती शासकीय जमीन उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. तीन तालुक्यांतील तलाठी, मंडल निरीक्षक, वन विभागाचे कर्मचारी शासकीय जमिनीची पाहणी करणार आहेत. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना निश्चित कालमर्यादेत प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे; परंतु शासकीय आदेश होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे शुक्रवारी ३३ व्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. काही आंदोलक गावी गेले आहेत. (प्रतिनिधी)