आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणारच - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 03:28 PM2021-03-03T15:28:22+5:302021-03-03T15:37:19+5:30
Hasan Mushrif Dam Kolhapur- आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच आपले ब्रीद असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच आपले ब्रीद असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आंबेओहोळ प्रकल्पाच्या कामासाठी २० वर्षापेक्षा जादा काळ झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण स्वतः केलेला आहे.
लाभक्षेत्रामध्ये जमिनी मिळण्यामध्ये अडचणी झाल्यानंतर प्रति हेक्टर ३६ लाख रुपये दराने २५८ हेक्टरसाठी एकूण ९३ कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले आहे. त्यापैकी १२९ हेक्टरसाठी २५८ जणांना ४६ कोटी ४४ लाख रुपये पॅकेजचे वाटप झाले आहे. तसेच १०६ हेक्टर जमिनीचे वाटप होऊन त्यामध्ये ९६ जणांना पूर्णत: जमीन वाटप व ३२ जणांना अंशत: जमीन वाटप झाल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
संकलन दुरुस्ती, कुटुंबाची व्याख्या, चार एकरांपेक्षा जादा जमिनी देण्याबाबत अडचणी व इतर सर्व प्रश्नांचा निपटारा येत्या १५ दिवसांमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत १५ मार्च रोजी प्रश्ननिहाय बैठक घेणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे माझे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.