अवनीतर्फे भिक्षुक बालकाचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:02+5:302021-04-02T04:25:02+5:30
कोल्हापूर : अवनी संस्थेमार्फत शहरात सर्वेक्षण सुरू असताना बागल चौकात दिव्यांग महिला आपल्या दोन मुलांसह भिक्षा मागताना ...
कोल्हापूर : अवनी संस्थेमार्फत शहरात सर्वेक्षण सुरू असताना बागल चौकात दिव्यांग महिला आपल्या दोन मुलांसह भिक्षा मागताना आढळली. तिची चौकशी करून प्रबोधन केले. दोन मुलांपैकी एका मुलास बालगृहात दाखल करून त्याचे पुनर्वसन केले.
अवनी संस्था गेली २७ वर्षे अनाथ, निराधार, वंचित बालकामगार, बालभिक्षेकरी, स्थलांतरित कामगारांची मुले, कचरावेचक महिलांची मुले यांच्या अधिकारासाठी लढत आहे. गांधी सोसायटीच्या सहयोगाने बालकामगार व बालभिक्षेकरी मुक्तता व पुनर्वसन हा प्रकल्प सुरू केला आहे. गेल्या चार महिन्यांत ४० बाल भिक्षेकरी मुलांचे संस्थेमार्फत पुनर्वसन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग बनलेली महिला आपल्या दोन मुलांसोबत बागल चौकात भिक्षा मागताना आढळली. त्यांची चौकशी केल्यानंतर ती महिला लहानपणापासूनच पोलिओमुळे दिव्यांग बनल्याचे समजले. तिचा पती सतत आजारी असतो. त्यामुळे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने ती भिक्षा मागते. आंतरजातीय विवाह झाल्यामुळे मुलांचे जन्माचे दाखले व आधारकार्डसुद्धा तिच्याकडे नाही. या मुलांचे पुनर्वसन व्हावे. या उद्देशाने प्रकल्पाचे समन्वयक शिवकिरण पेटकर व प्रताप कांबळे यांनी महिलेचे सातत्याने प्रबोधन केले. मुलांना बालगृहात दाखल करण्याची विनंती केली. त्यानुसार एका मुलास बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यास बालगृहात दाखल केले. यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
पद्माराजे गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सभा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रलंबित सर्व विषयांसाठी संबंधित कार्यालयातून पाठपुरावा सुरू आहे. त्याला लवकरच यश येईल, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी केले. उजळाईवाडी येथील पद्माराजे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यात ते बोलत होते.
अहवाल वाचन सचिव नामदेव निपाणीकर यांनी केले. कामकाजात १७५ पैकी ६५ जणांनी सहभाग घेतला. यात काॅलनी अंतर्गत रस्ते, आरोग्य केंद्र, शहर वाहतूक बस सेवा, आदी प्रश्न विचारले. यावेळी ॲड. सम्राट घाटगे, सर्जेराव चौगले, सूर्यकांत कदम, इंद्रजित देवकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद विजय लोंढे यांनी आभार मानले.