गडहिंग्लजला फेरीवाल्यांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:31+5:302021-03-04T04:45:31+5:30
गडहिंग्लज : शहरातील संकेश्वर रोडवरील फेरीवाले, लक्ष्मी रोड व बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांमुळे गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला ...
गडहिंग्लज : शहरातील संकेश्वर रोडवरील फेरीवाले, लक्ष्मी रोड व बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांमुळे गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने परिसरातील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांचे पर्यायी पुनर्वसन केल्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी बुधवारी (३) मोकळा श्वास घेतला.
बाजारपेठेतील दुकाने, दुकानांसमोर आणि रस्त्यावर बसलेले भाजीविक्रेते, फेरीवाल्यांचे हातगाडे, बाजारासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी आणि होलसेल व्यापाऱ्यांची मालवाहतूक यामुळे अहिल्याबाई होळकर चौक, संकेश्वर रोड, लक्ष्मी रोड, बाजारपेठ, नेहरू चौक हा परिसर नेहमी गजबलेला असतो. विक्रेते व रस्त्यावरील वाहनांमुळे पायी चालत जाणेही मुश्कील बनते.
शहरातील गर्दीचे ठिकाण आणि वाहतुकीची कोंडी यामुळे महिला, लहान मुले, वयोवृद्ध आणि पादचाऱ्यांना कसरतीने मार्ग काढावा लागतो. यावर उपाय म्हणून पालिकेने भाजी विक्रेते व फेरीवाल्यांची मुलींच्या हायस्कूलजवळील खुल्या जागेत पर्यायी व्यवस्था करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी (३) विक्रेत्यांना पर्यायी जागेत हलविण्यात आले. त्यामुळे नेहमी वर्दळ व गर्दीचा माहोल असणाऱ्या या परिसराने आज मोकळा श्वास घेतला.
............
हॉकर्स कमिटीची बैठक होणार
फेरीवाल्यांना निश्चित जागा ठरवून देण्यासाठी हॉकर्स कमिटीची बैठक घेण्यात येणा आहे. तोपर्यंत दिलेल्या पर्यायी जागेत फेरीवाले भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.