उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून ५० टक्क्यांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:32 AM2019-02-20T00:32:54+5:302019-02-20T00:32:59+5:30
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ ...
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ लोटला असला, तरी १00 टक्केपुनर्वसन झालेले नाही. जमीन व भूखंडांसाठी पसंतीचे अर्ज देऊन १0-१0 वर्षे झाली, तरी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांचे हात रितेच राहिले आहेत.
राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला २००१ मध्ये मंजुरी मिळून, त्याच्या कामाला सुरुवात झाली. अद्याप धरणाचे काम ७० टक्केच झाले असून, पुनर्वसन ६० टक्केझाले आहे. राई, पडसाळी, कंदलगाव ही गावे बाधित होऊन, येथील २४९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राधानगरी तालुक्यातच राई व कंदलगाव प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये झाले आहे. या वसाहती नुसत्या नावालाच आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते अशा भौतिक व नागरी सुविधांची वानवा आहे. अजून ४० टक्केप्रकल्पग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. यातील अनेक जणांना जमीनच मिळालेली नाही. ज्यांनी जमीन मागणीसाठी पसंतीचे फॉर्म भरून दिले आहेत. त्यांना आठ-१0 वर्षे उलटली, तरी वाटच बघावी लागत आहे. आठ वर्षांपासून या प्रकल्पाशी संबंधित एकही आदेश निघालेला नाही. शासकीय यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार, यामुळेच प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ आली आहे.
आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाला १९९६ मध्ये मंजुरी मिळून, प्रत्यक्ष कामाला १९९९ मध्ये सुुरुवात झाली. अद्याप ७५ टक्केकाम झाले असून, सांडवा आणि घळभरणीचे काम बाकी आहे. पुनर्वसन ५० टक्केच झाले आहे. येथील उचंगी, चाफवडे, जेऊर, चितळे ही गावे बाधित झाली असून, २८८ प्रकल्पग्रत पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच १00 टक्केपुनर्वसन व्हावे, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने करूनही प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.