वारणा चोरी प्रकरणी दोघा आरोपींचे जामीन फेटाळले
By admin | Published: May 9, 2017 06:13 PM2017-05-09T18:13:53+5:302017-05-09T18:13:53+5:30
महादेव ढोले, संदीप तोरस्कर यांचा कारागृहातील मुक्काम वाढला
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणातील संशयित महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) व संदीप बाबासाहेब तोरस्कर (३७ रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी फेटाळला. त्यामुळे या दोघांचा बिंदू चौक कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मैनुद्दीन मुल्ला याचा साथीदार संशयित संदीप तोरस्कर याला अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये महादेव ढोले याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली. चौकशीमध्ये महादेव ढोले याने शिक्षक कॉलनीतील खोलीमध्ये मोठी रक्कम ठेवली असल्याची टिप मैनुद्दीनला दिली होती. त्याकरिता त्याला मैनुद्दीनने पंधरा लाख रुपये दिले होते.
संदीप तोरस्कर याचा गुन्ह्यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बरीचशी रक्कम जप्त केली आहे. तोरस्कर याने चोरीवेळी आपल्या तवेरा गाडीचा वापर केला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यांनी वकिलांतर्फे जामीन मिळावा म्हणून न्यायाधीश बिले यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. सरकारी वकील ए. एम. पीरजादे यांनी जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. हा गंभीर गुन्हा असून त्याची व्याप्ती मोठी आहे. याच्या तपासामध्ये वेळोवेळी अनेक पैलू निष्पन्न होत आहेत. या गुन्ह्याचा तपास अद्याप अपुरा आहे. त्याकरिता तपास अधिकाऱ्यास मोकळेपणाने तपास करण्याची मुभा असणे गरजेचे आहे. या आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास तपासावर गंभीर परिणाम होऊन महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे, असे अनेक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायाधीश बिले यांनी या सर्व परिस्थितीचा बारकाईने विचार करून दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
रेहान अन्सारी गेला कुठे?
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणाचा तपास गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. सांगली पोलीस, कोल्हापूर पोलीस व सीआयडी या तिन्ही तपास यंत्रणांना अद्यापही रेहान अन्सारी याचा शोध घेता आलेला नाही. अन्सारी याचा चोरी करताना प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्याकडे नेमके किती पैसे आहेत, याचीही कल्पना पोलिसांना नाही. तो बिहारला असल्याची चाहूल पोलिसांना लागली होती; परंतुु त्यांनी तिकडे पथक पाठविण्याची तसदी घेतली नाही.
पथके रिकाम्या हातांनी परतली
शिक्षक कॉलनीतील ३ कोटी ११ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणातील आरोपी मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून तडजोडीवर बुलेट खरेदी करणारा मिरज गांधी चौक पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ याला सहआरोपी केले आहे. सांगली पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला आहे. त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई दाखवीत असल्याने त्याच्या शोधासाठी पुणे-मुंबई येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके पाठविली होती. ती रिकाम्या हातांनी परत आली आहेत. इरफानच्या कुटुंबाचाही थांगपत्ता लागला नसल्याचे तपास अधिकारी सांगत आहेत.
अटकेचा मुहूर्त सापडेना!
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करणारे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर महादेव पाटील, दीपक उत्तमराव पाटील, पोलीस नाईक रवींद्र बाबूराव पाटील हे पोलिसांच्या अवतीभोवतीच आहेत. ‘सीआयडी’ने मनात आणले तर या सर्वांना ते तत्काळ अटक करू शकतात; पण त्यांना अद्याप मुहूर्त सापडलेला दिसत नाही.