सीबीआय तपास सुनावणीस खंडपीठाकडून नकार
By admin | Published: March 5, 2015 12:23 AM2015-03-05T00:23:30+5:302015-03-05T00:25:15+5:30
उच्च न्यायालय : तिरोडकर यांची याचिका
कोल्हापूर/ मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा, या मागणीच्या याचिकेची सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे ही याचिका आता मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्यासमोर ठेवण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारांकडे केली आहे.
पानसरे हत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा, या मागणीची याचिका तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठास सादर केली होती. दरम्यान, या याचिकेच्या कामी पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हुकूम करू नये, असा अर्ज ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी न्या. पी. व्ही. हरदास व जोशी यांच्या खंडपीठासमोर दाखल केला होता परंतु याबाबत सुनावणी होण्यापूर्वीच खंडपीठाने आपल्यासमोर दोन्हीही याचिका नकोत, असा निर्णय दिला. दुपारी ही याचिका न्यायाधीश ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली. त्यांनीही याचिका आपल्यासमोर नकोत, असे नमूद केले. त्यामुळे याचिका आता मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवण्याची विनंती तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारांकडे केली आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश शहा यांच्या आदेशानुसार ही सुनावणी नवीन खंडपीठाकडे जाईल, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ज्ञ नेवगी यांनी दिली.