घोडावत खंडणीप्रकरणी इचलकरंजी, जयसिंगपुरातील स्थानिकाचा संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:10+5:302021-07-02T04:18:10+5:30
उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रमेशकुमार ठक्कर ( मुंबई ) यांचे मोबाइल डिटेल्स पोलिसाकडून ...
उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रमेशकुमार ठक्कर ( मुंबई ) यांचे मोबाइल डिटेल्स पोलिसाकडून तपासले असता यात स्थानिकाचा सहभाग स्पष्ट झाला आहे. रविकिरण बाबूराव सोकाशे (वय ४१ रा. इचलकरंजी) आणि दतात्रय महादेव धुमाळे (वय ४५ रा. जयसिंगपूर) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केले असता रमेशकुमार ठक्करसह तीनही आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य सूत्रधार व्ही.पी. सिंग (दिल्ली ) हा फरारी आहे.
घोडावत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संजय घोडावत त्यांचे भागीदार नीलेश बागी (बेळगाव) यांच्यासह त्यांच्या कुंटुबीयांना जिवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या रमेशकुमार प्रजापती ठक्कर आणि व्ही.पी. सिंग( दिल्ली ) यांच्याविरुद्ध संजय घोडावत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. रमेशकुमार ठक्कर याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चौकशीअंती स्थानिक संशयित गुन्हेगार असल्याचे या प्रकरणी निष्पन झाल्याचे उघड झाले आहे. इचलकरंजी येथील रविकिरण सोकाशे आणि जयसिंगपुरातील दत्तात्रय धुमाळे यांच्यामार्फत रमेशकुमार ठक्कर आणि व्ही.पी सिंग यांनी जीएसटी चुकवेगिरीची माहिती पुरवलली असावी, असा पोलिसाचा अंदाज आहे.