खाकी वर्दीतील संवेदनशीलता, माणुसकीच्या भावनेतून 'त्यांनी' 'त्या' मृताच्या नातेवाईकांचा 'असा' लावला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 12:02 PM2022-01-03T12:02:57+5:302022-01-03T12:09:33+5:30
पोलिसांनी 'त्या' मृताच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू केली. चहागाडीवरील कामगाराने त्याला दाखल केले होते. त्याचा मोबाईल नंबर हाच तपासाचा धागा होता. पण..
कोल्हापूर : गेली महिनाभर उपचार घेणाऱ्या व्यक्तीचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला, अन् त्याचे नातेवाईक शोधण्यासाठी सुरु झाली पोलिसांची पळापळ. एका चहागाडीवर काम करणाऱ्याने त्याला दाखल केल्याची इतकीच माहिती मिळाली, त्याचा नंबरही मिळाला.
त्या अधारे राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तारळेकर यांनी अथक परिश्रमानंतर माणुसकीच्या भावनेतून नातेवाईकांचा शोध घेत मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला.
सीपीआरमध्ये एकाचा मृत्यू झाला. वर्दी राजारामपुरी पोलिसांना मिळाली. नातेवाईक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तारळेकर यांनी नातेवाईकांची शोधाशोध सुरू केली.
चहागाडीवरील कामगाराने त्याला दाखल केले होते. त्याचा मोबाईल नंबर हाच तपासाचा धागा होता. पण त्या नंबरचा रिचार्ज बॅलेन्स संपल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.
तारळेकरांनी त्या नंबरवर रिचार्ज मारला. अखेरीस तो मोबाईल सुरू झाला, संपर्कही झाला. त्यांना कलगुटकर व तारळेकर यांनी मोबाईलवर परिस्थिती समजावून सांगितली. पोलीस त्या चहावाले कामगाराच्या गांधीनगरमध्ये गेले, तेथे त्यांनी मृत व्यक्ती ही राजारामपुरी भागातील असल्याची पुसटशी माहिती सांगितली.
त्याआधारे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनानुसार मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. आठ तासांनी नातेवाईक सापडले. त्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.