मनोरूग्णांच्या नातेवाईकांकडून परतीचे दरवाजे बंद
By admin | Published: September 12, 2014 11:29 PM2014-09-12T23:29:51+5:302014-09-12T23:30:24+5:30
तोंडात दात नाहीत, डोक्यावर केस नाहीत, वार्धक्याने शरीर झुकले आहे.
मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
तोंडात दात नाहीत, डोक्यावर केस नाहीत, वार्धक्याने शरीर झुकले आहे. हातापायात तर त्राणच नाही. सामाजिक संस्थांनी दिलेल्या व्हीलचेअरवरचा प्रवास. त्यातले काहीजण आजही मानसिक आरोग्य संतुलित नसलेले. पण काहीजण पूर्वपदावर आलेले. पण जीवाभावाचे नातेवाईक हात सोडून गेले असल्याने अख्खं आयुष्यच मानसिक आरोग्य संस्थेच्या चार भिंतींमध्ये कोंडलेलं.. ही व्यथा रत्नागिरीतील मानसिक आरोग्य संस्थेतील अनेक रूग्णांच्या नशिबी आली आहे. नातेवाईकांनी कसलीच आस्था न दाखवता त्यांची साथ सोडल्यामुळे ते इथेच खितपत पडले आहेत.
मानसिक संतुलन बिघडल्याने वयाच्या अवघ्या २० व्या किंवा २२ व्या वर्षी मनोरूग्णालयात दाखल केलेल्या काही रूग्णांना अवघे आयुष्यच मनोरूग्णालयात घालवावे लागले. सध्या ७५ ते ८५ वयोगटातील २० रूग्ण येथे आहेत. १९६१पासून काही मंडळी दाखल आहेत. लहान बाळाप्रमाणे या मंडळींची काळजी घ्यावी लागते. त्यांची ओळख पटत नाही, नातेवाईकांनी संपर्काचे चुकीचे पत्ते दिले आहेत. त्यामुळे या मंडळींना घरचे दरवाजेच बंद झाले आहेत.
येथील कर्मचारी मात्र त्यांना वेळेत खाऊपिऊ घालण्याबरोबर आंघोळीपासून स्वच्छता ठेवण्यापर्यंत प्रत्येक काम मनात कोणताही किंतु न बाळगता करतात. त्यांची पूर्ण काळजी घेतात.
जे २९ वृध्द याठिकाणी आहेत त्यांना अंतिम श्वासापर्यंत याठिकाणीच राहायचे आहे, हे निर्विवाद! कारण या मंडळींना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नाकारलं आहे. काहींच्या नातेवाईकांचा शोधच लागत नाही. काही वृध्द मनोरूग्णांनी शेवटचा श्वासही येथेच घेतला आहे. मृत्यूनंतर पोलिसांना कल्पना दिली जाते. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला जातो. मृत्यूनंतर तीन दिवस संबंधितांच्या नातेवाईकांची वाट पाहून त्यानंतर नियमाप्रमाणे शव येथील नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येते. आणि मग वारसदारांनी साथ सोडलेल्या या दुर्दैवी जीवांवर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार होतात.
व्यवसाय उपचार केंद्रातून पुनवर्सन
मानसिक आरोग्य बिघडलेला रूग्ण कोणालाच नको असतो. किंबहुना त्याच्यामुळे समाजातील प्रतिष्ठा बिघडू नये, यासाठी नातेवाईक रूग्णांना थेट मनोरूग्णालयात दाखल करतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करताना व्यवसाय कौशल्याच्या माध्यमातून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रादेशिक मनोरूग्णालय धडपडत आहे. मनोरूग्णाच्या आजाराची लक्षणे, शिक्षण, कुटुंब व्यवस्था व पार्श्वभूमी याची दखल घेऊनच व्यवसाय शिकविले जातात. शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, क्राफ्ट, ज्वेलरी मेकिंग, स्क्रीनप्रिंटिंग, सुतारकाम, बागकाम, शेती याशिवाय संगणक अभ्यासही शिकविला जातो. काहीजण स्वयंपाकघरातही काम करतात. हे सर्व सुरू असताना त्यांच्या वैद्यकीय उपचाराकडेही लक्ष देण्यात येते.