‘कडकनाथ’च्या घोटाळ्यात सदाभाऊंचे नातेवाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:50 AM2019-08-28T00:50:34+5:302019-08-28T00:50:38+5:30
कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली संस्थाही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत ...
कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली संस्थाही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित नातेवाइकाची असल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांवर कारवाई केली नाही तर त्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेत कडकनाथ कोंबड्या सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.
शेट्टी म्हणाले, सांगलीतील ज्या कंपनीने फसवणूक केली आहे, तिचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे. कंपनीचे नावही ‘रयत’ यावरूनच दिले आहे.
अलीकडेच संबंधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे.
याबाबत खोत यांनी अद्याप खुलासा केलेला नाही किंवा ते टाळूही शकत नाहीत.
कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या कंपनीला राजकीय आश्रय आहे. ज्या अर्थी पोलीस गुन्हे दाखल करून घेत नाहीत, त्या अर्थी राज्यमंत्री खोत यांचा
दबाव असल्याचे दिसते.
पोलिसांनी तक्रारी दाखल करून घेतल्या नाहीत तर त्या ‘स्वाभिमानी’कडे द्याव्यात, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.
या फसव्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
राज्य बॅँक गैरव्यवहाराची सखोल चौकशी कराच
राज्य बॅँकेतील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली. ज्यांच्यावर आरोप आहेत, ते भाजप व शिवसेनेत गेले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्<रठॠ-दळर>ांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे, असे शेट्टी यांनी सांगितले.
... तर राजकीय संन्यास : सदाभाऊ खोत
कोल्हापूर : ‘कडकनाथ’चा फसवणूक करणारा माझा जावई आहे, हा ‘जावईशोध’ राजू शेट्टी यांनी कधी लावला? फसवणूक करणारा जावई सोडाच पण जवळचा नातेवाईक जरी निघाला तरी आपण राजकीय संन्यास घेऊ. पण आरोप खोटा निघाला तर शेट्टी राजकीय संन्यास घेणार का? असा सवाल करत शेट्टींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
शेट्टी हे माझ्यासोबत २५ वर्षे होते, त्यांना माझे सर्व नातेवाईक माहिती असताना हा ‘जावईशोध’ कोठून लावला. मला मुलगी नाही, त्यात सख्खाभाऊही नाही. त्यामुळे माझा जावई असणे शक्यच नाही. माझ्या गावात ७० टक्के खोत आहेत. यापैकी कोणाची तरी मुलगी संबंधित फसवणूकदाराला दिली असेल, तर त्याचा संबंध माझ्याशी कसा? शेट्टी यांनी जावयाचे नाते शोधण्यासाठी माझी वंशावळ काढावी, जर त्यात माझा जावई निघाला तर आपण राजकीय संन्यास घेतो. नसेल तर शेट्टींनी संन्यास घ्यावा, असे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले.