हिंदू समाजाच्या बक्षिसपत्रासाठी दस्त अट शिथिल करावी : शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:49 PM2018-09-29T13:49:26+5:302018-09-29T13:53:02+5:30
मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील
कोल्हापूर : मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
संजय पवार म्हणाले, मुस्लिम समाजाला हिबा या कायद्याप्रमाणे तोंडी स्वरूपात बक्षिसपत्र असेल व बक्षिसासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता झाली असेल, तर ते कायदेशीर मानले जाते. तोंडी बक्षिस पत्रासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी नोंदणी केलेला दस्त हवाच, अशी कोणतीही अट नाही; परंतु हिंदू समाजाला मात्र बक्षिसपत्रासाठी स्टॅँप ड्यूटी भरावी लागते. तसेच एक टक्का एलबीटीही त्यांना भरावा लागतो; त्यामुळे मुस्लिम समाजाची सवलत बंद न करता हिंदूंनाही त्याप्रमाणे सवलत द्यावी.
निवेदनात म्हटले आहे की, ‘खलीलउल्ला वि. इवाजअली ए. आय. आर. २२३ औध २१४’ या मुस्लिम कायद्याप्रमाणे बक्षिस पत्रासाठी नोंदणीची गरज नाही. भारतातील हिंदंूना एक कायदा व मुस्लिम समाजाला एक कायदा हे अन्यायकारक आहे. अनेक कुटुंबात बक्षिस पत्रावरून किंवा स्टॅँप ड्यूटी भरण्यावरून संघर्ष सुरू आहेत. अनेक ठिकाणी कायदेशीर लढाई सुरू आहे, तरी हिंदू समाजालाही १०० ते ५०० रुपये स्टॅँपवर बक्षिसपत्र करण्यासंदर्भात शासनाने कायदा करून दिलासा द्यावा.
शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, प्रा. शिवाजी पाटील, राजू यादव, राजू पाटील, दिलीप देसाई, शशिकांत बिडकर, दिनेश परमार, रणजित आयरेकर, विराज ओतारी, रफिक नायकवडी, संजय जाधव, दिलीप जाधव, संदीप पाटील, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ, आदींचा समावेश होता.