Corona restrictions : जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा मोकळीक, पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 05:43 PM2022-02-02T17:43:21+5:302022-02-02T17:43:54+5:30
उद्या, 3 फेब्रुवारी रोजी 12 वाजल्यापासून निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
कोल्हापूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. उद्या, गुरुवार पासून ही शिथिलता देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिले.
ज्या जिल्ह्यात दि. 30 जानेवारी रोजी 18 वर्षावरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस व 70 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाने लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी दिली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या, 3 फेब्रुवारी रोजी 12 वाजल्यापासून निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
अटी व शर्ती पुढालप्रमाणे
- रात्री 11 वा. ते पहाटे 5 वाजेपर्यंत घालण्यात आलेली बंदी शिथिल करण्यात आली आहे.
- स्पर्धात्मक खेळांसाठी बंदीस्त किंवा खुल्या ठिकाणी होणाऱ्या व बैठक व्यवस्था असणाऱ्या किंवा नसणाऱ्या ठिकाणी आसन क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल त्यास परवानगी असेल.
- जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.
* पर्यटन स्थळाच्या सुरूवातीच्या ठिकाणी (Entry Point) पर्यटकांकडून कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन, तपासणी पथके नियुक्त करावीत.
* पोलीस प्रशासनाने सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शक्य तेथे कर्मचारी नेमावेत. पर्यटकांकडून कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होत असल्याबाबतची तपासणी करावी.
* प्रत्येक पर्यटकाचे थर्मल स्कॅनिंग करावे. थर्मल स्कॅनिंगमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त अढळल्यास त्याला या ठिकाणी प्रवेश देण्यात येवू नये.
* आठवड्याच्या शेवटी (weekend) व सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी पर्यटन स्थळावर होणाऱ्या जादाच्या गर्दीसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी योग्य नियोजन करावे
- जिल्ह्यात यात्रा व जत्रांचे आयोजन करताना दिनांक 9 जानेवारी रोजीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे 50 व्यक्तींना फक्त पारंपारिक धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी असणार आहे.
- या ठिकाणी स्टॉल लावण्यास खुल्या / मोकळ्या जागेत दोन विक्रेत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवून व कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.
वरील आदेशाचे पालन न करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.