kolhapur news: काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडा, मुदाळतिट्टा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:03 PM2023-01-23T18:03:11+5:302023-01-23T18:04:30+5:30
पाणी नसल्याने पिकाचे नुकसान
दत्तात्रय लोकरे
सरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गेले वीस दिवस पाणी नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असून अन्य शेतीकामे खोळंबली आहेत. त्यामुळे तात्काळ पाणी सोडावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी बोरवडे-बिद्री परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने मुदाळतिट्टा येथे बांधकाम सुरु असलेल्या पुलावरच निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे म्हणाले, राधानगरी- निपाणी रोडवर उजव्या कालव्यावर पुलाचे बांधकाम सुरु करताना संबंधित विभागाने पाण्याचे व वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने तशी काळजी घेतली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी कष्टाने घाम गाळून हजारो रुपये मशागत, बि- बियाण्यांवर खर्च केले असून ते वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा मुदाळतिट्टा येथे मोठे जनआंदोलन उभा केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच विनोद वारके, मारुती पाटील, राजेंद्र चौगले, तानाजी साठे, के. के. फराकटे, बाळासाहेब बलुगडे, अण्णासो पोवार, बाळासाहेब फराकटे, दत्तात्रय पाटील, निवृत्ती साठे, जोतिराम साठे, स्वप्निल फराकटे, दत्तात्रय चांदेकर, राजेंद्र जाधव, निवास चव्हाण, नेताजी कांबळे, अमोल गुरव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.