ए. एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांना दिलासा! फेब्रुवारीत पैसे परत देण्याचा नवा वायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:39 AM2023-01-25T11:39:14+5:302023-01-25T11:39:56+5:30
कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखांनी झूम मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिला विश्वास
कोल्हापूर : गुंतवणूकदारांनो आजपर्यंत तुम्हाला कंपनीने वेळच्या वेळी परतावे दिले आहेत. सध्या कंपनी काहीशा अडचणीतून जात आहे; परंतु आमच्यावर विश्वास ठेवा. तुमचे सर्व परतावे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित होतील, असा विश्वास ए. एस. ट्रेडर्सच्या वतीने कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखांनी झूम मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या गुंतवणूकदारांना शेअर केला जात आहे.
या व्हिडीओमध्ये बोलणारा अधिकारी सांगतो की, आम्ही गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करायचे, याचा आराखडा तयार करीत आहे; परंतु कंपनीचे प्रमुख लोहितसिंग सुभेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही अडचणी येत आहेत.
काही गुंतवणूकदार आम्हाला वारंवार आम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार करणार, केस करणार अशी भाषा करत आहेत; परंतु तसे करून तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. एकदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला तर तारीख पे तारीख असा व्यवहार सुरू होतो. त्यातून कंपनीचे कामही ठप्प होईल व तुमचे परतावेही परत मिळणार नाहीत. गेली दोन-तीन महिने तुम्ही संयम बाळगला आहेच. तसाच संयम यापुढेही काही दिवस बाळगावा.
आम्ही तुम्हाला गेल्या आठ वर्षांपासून गुंतवणुकीवर दिलेले परतावे नियमित परत केले आहेत, तसेच यापुढेही परत केले जातील. कुणीच घाबरून जाऊ नका. अडचणीच्या काळात कंपनीला सहकार्य करा. तुमच्या सर्वांच्या विश्वासावरच कंपनी या अडचणीतून बाहेर निघू शकेल. जानेवारीअखेरपर्यंत पैशाची व्यवस्था झाल्यावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व गुंतवणूकदारांची झूम मीटिंग घेतली जाईल.
नवे वायदे..
कंपनीकडून दर काही दिवसांनी अशी झूम मीटिंग घेऊन पैसे परत करण्याचे वायदे दिले जात आहेत; परंतु परतावे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे.
असाही प्रयत्न..
आतापर्यंत ज्यांना कंपनीचा प्रचंड फायदा झाला..त्यांनी काही रक्कम कंपनीकडे परत गुंतवावी.. त्यातून ज्यांचे परतावे थकीत आहेत त्यांना रक्कम परत करता येईल असाही कंपनीचा प्रयत्न आहे; परंतु त्यास फारसा कुणाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
कर्मचाऱ्यांचा पगार
कंपनीच्या कोल्हापुरातील तीन कार्यालयांत काम करणारे ज्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार दिला जात होता, त्यांचाही तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यांनीही पगाराच्या मागणीसाठी तगादा लावला आहे.