मुस्लिम समाजाने जोपासला मदतीचा धर्म
By admin | Published: August 21, 2016 12:03 AM2016-08-21T00:03:39+5:302016-08-21T00:08:27+5:30
‘मुस्लिम वेल्फेअर’चा उपक्रम : निराधार महिला, गरजूंना मदतीचा हात
दत्ता पाटील --तासगाव --जात, धर्म कोणताही असला तरी, दारिद्र्याचा शाप असलेल्या सर्वांना त्याचे चटके एकसारखेच असतात. त्यातच एखादे संकट ओढवले, तर मदतीचा हात कोणाकडे पसरायचा, हा प्रश्न सतावणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी तासगावातील मुस्लिम समाज बांधवांनी पुढाकार घेतला. येथील मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून निराधार महिलांसह आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचे व्रत जोपासले जात आहे.
तासगाव शहरात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. या समाजातील गरीब कुटुंबांना हातभार लावण्यासाठी २०११ मध्ये समाजातील काही लोकांनी एकत्रित येत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली. या माध्यमातून लोकांना मदतीचे आवाहन केले. मुस्लिम धर्मात दान करण्याला मोठे महत्त्व आहे. या दानाचे महत्त्व पटवून देत दान गोळा करण्यासाठी मदतीचे दोनशे डबे तयार केले. ज्यांच्याकडे हे डबे आहेत, त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना, या डब्यात काही रक्कम टाकली जाते. या मदतीतून मदतीचा ओघ सुरू झाला.
या संघटनेने निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील तब्बल ३२ महिलांना महिन्याला ५०० रुपये पेन्शन देण्यास सुरुवात केली. चार वर्षांपासून पेन्शन नियमितपणे सुरू आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला संबंधित महिलांच्या खात्यावर पेन्शन जमा होत असते. चार वर्षांत ही तारीख एकदाही चुकलेली नाही. दोन वर्षापूर्वी समाजातील एका निराधार महिलेचा अपघात झाला. तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. ही घटना कळल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. तेव्हापासून अपघात आणि वैद्यकीय उपचारासाठी पाच हजारांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येत आहे. या पदाधिकाऱ्यांची तळमळ पाहून अनेकदा संबंधित डॉक्टर उपचाराचा खर्चही कमी करतात.
संघटनेचे सचिव मुनाफ नदाफ जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. सुरुवातीला शहरातील गरजूंनाच या मदतीचा लाभ होत होता. मात्र, नदाफ ग्रामीण भागात शिक्षक असल्याने त्यांनी पुढाकार घेत ग्रामीण भागातही लाभ मिळवून देण्यास सुरुवात केली. केवळ पैशांअभावी शिक्षण थांबलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संघटनेमुळे ज्ञानाचा उजेड पसरला. तीन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली असून, अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे जाफर मेहत्तर, मुनाफ नदाफ, इलाही मोमीन, अजमुद्दीन तांबोळी, इकबाल पठाण, रफिक बारस्कर, अल्ताफ म्हेत्तर, इकबाल आत्तार, मुबारक मुरसल, हारुण विजापुरे, जावेद मुल्ला आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जाती-धर्माच्या पलीकडे सामाजिक बांधीलकी
मुस्लिम समाजातील लोकांना मदत करण्यासाठी असोसिएशनची सुरुवात झाली. संघटनेच्यावतीने तालुक्यातील अनेक गरजूंसह तासगाव शहरातील अन्य धर्मातील गरजूंनाही मदत करून जाती-धर्माच्या पलीकडे सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे. ज्यांच्या घरात पैशांअभावी सण, उत्सव साजरे होत नाहीत, अशा कुटुंबांनाही मदत करण्यापासून अनेकविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधीलकी जोपासली जात आहे.