कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली तृतीयपंथीयांचा धिंगाणा, माजी नगरसेवकासह २० जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:56 PM2022-08-17T13:56:44+5:302022-08-17T13:57:26+5:30
हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर सुरू होता धिंगाणा
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सोमवारी देवीचे जग आणण्याच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर काही तृतीयपंथीयांनी अत्यंत लाजिरवाणे नृत्य करण्याचा प्रकार केला. हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर हा धिंगाणा सुरू होता. पुरोमागी कोल्हापुरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
दरम्यान, धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली मद्यपान, धूम्रपान करून अश्लील हावभाव करणाऱ्या २० जणांवर मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. विनापरवाना मिरवणूक काढणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे अशा कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये पंचगंगा तालीम मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी, उपाध्यक्ष राकेश रंगराव पोवार, सलमान रियाज बागवान, नितीन बाळासाहेब साळी, किरण प्रकाश साठम (सर्व रा. शुक्रवार पेठ), तसेच १० अनोळखी व्यक्ती व अश्लील नृत्य करणाऱ्या चार अनोळखी तृतीयपंथींवर गुन्हे दाखल केले.
शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने तिसऱ्या सोमवारनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे देवीचे जग आणण्याची दरवर्षी प्रथा आहे. सोमवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी देवीच्या जगांची मिरवणूक पंचगंगा तालीम ते गंगावेशपर्यंत काढली. मिरवणुकीत विनापरवाना डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथीयांनी समाजाला लाजवेल असे हावभाव करीत नृत्य केले. भर गर्दीतही स्टेजवर तृतीयपंथींचा सिगरेटचा धूर काढत डॉल्बीच्या ठेक्यावर अश्लील नृत्याचा धिंगाणा सुरू होता.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना राजर्षी छ. शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमांत अशा पद्धतीने धिंगाणा सुरू होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा सारा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण, आज आमचा दिवस आहे, आम्हाला रोखायचे नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. त्यामुळे पोलीसही हतबल झाल्याचे अनेकांनी सांगितले.
संयोजकांवर कारवाईची शिवसेनेची मागणी
पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने अशा धार्मिक सोहळ्यात छोटी वस्त्रे परिधान करून अश्लील हावभाव करीत तृतीयपंथीयांना नाचवले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर हा तृतीयपंथींचा नाच व व्यसनाधीन कार्यकर्त्यांचे कृत्य हिंदू धर्माच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे संयोजकांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे आदींच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांना दिले.