मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत ज्योतिबावर धार्मिक विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:42 PM2021-04-26T13:42:10+5:302021-04-26T15:08:21+5:30
Jyotiba Temple CoronaVIrus Kolhapur : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि जिल्ह्यात पुकारण्यात आलेली संचारबंदी या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आज, सोमवारी पहाटे श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेतील धार्मिक विधी करण्यात आले. आता हा सोहळा १६ मानकऱ्यांसह देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी अशा ४५ जणांच्या उपस्थितीत होत आहे.
जोतिबा /कोल्हापूर :चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी, ता. २६ एप्रिल रोजी जोतिबा डोंगर येथील भाविकाविना पारंपारिक पद्धतीने चैत्र यात्रेस प्रारंभ झाला असून दख्खनचा राजा जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे यंदा जोतिबा देवाची चैत्र यात्रा दुसऱ्यादा रद्द केली आहे. जोतिबा डोंगराकडे सर्व रस्ते बंद केले आहेत. दरम्यान, पहाटे पाच वाजता पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे उपस्थित होते.
सकाळी सहा वाजता जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. ही पुजा प्रविण कापरे, कृष्णात दादर्णे , प्रकाश सांगळे या पुजाऱ्यांनी बांधली .दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळयाचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण सुरू केले आहे. सायंकाळी हस्त नक्षत्रावर मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघणार आहे. जोतिबा डोंगरावर मोठा पोलिस बंदोबस्त आहे.
देवस्थानतर्फे लाईव्ह दर्शनाची सोय
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांचे श्री ज्योतिबा हे श्रद्धास्थान आहे. त्यात संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भक्तांना ज्योतिबाची भेट घेता येणार नाही. त्यामुळे हजारो भक्त दर्शनाची आस लावून बसले आहेत. ही बाब जाणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेनिमित्त होणारे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे थेट फेसबुकच्या माध्यमातून प्रसारण सुरु आहे.