कोल्हापुरात चंद्रग्रहण, अंबाबाई मंदिरात धार्मिक विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:31 PM2019-07-18T16:31:58+5:302019-07-18T16:33:11+5:30
या वर्षातील दुसरा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग बुधवारी कोल्हापूरकरांना मिळाला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता चंद्रग्रहण सुटले. खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त मंगळवारी मध्यरात्री अंबाबाई मंदिरात ग्रहणकाळातील धार्मिक विधी करण्यात आले.
कोल्हापूर : या वर्षातील दुसरा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग बुधवारी कोल्हापूरकरांना मिळाला. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता चंद्रग्रहण सुटले. खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त मंगळवारी मध्यरात्री अंबाबाई मंदिरात ग्रहणकाळातील धार्मिक विधी करण्यात आले.
मंगळवारी रात्री नित्योपचाराप्रमाणे शेजारती झाल्यानंतर देवीचा गाभारा बंद करण्यात आला. रात्री पाऊण वाजता देवीचा गाभारा पुन्हा उघडण्यात आला. यानंतर देवीची पूजा व काकडा झाला. पुढे ग्रहणकाळातील अनुष्ठान, विधी झाले. बुधवारी पहाटे साडेचार वाजता ग्रहण संपल्यानंतर अनुष्ठान पूर्ण करून देवीच्या नित्योपचारांना सुरुवात झाली व अभिषेक, पूजा, काकडा व अन्य धार्मिक विधी करण्यात आले.
चंद्रग्रहणाविषयी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात वेगळ्या श्रद्धा असल्या, तरी खगोलीय चमत्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा योग अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. मंगळवारी मध्यरात्रीपासून या वर्षीच्या दुसऱ्या चंद्रग्रहणाला सुरुवात झाली.
ग्रहण स्थितीत चंद्राचे निरीक्षण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने दुर्बिण लावण्यात आली होती. मध्यरात्री १ वाजून २९ मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरुवात झाली. त्यानंतर चंद्राची स्थिती बदलत गेली. पहाटे साडेचार वाजता हे ग्रहण सुटले. या ग्रहण काळात खगोलप्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी चंद्राची स्थिती पाहण्याचा लाभ घेतला.