रेमडेसिविर काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:09 AM2021-05-10T10:09:46+5:302021-05-10T10:19:52+5:30
Crimenews Kolhapur : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली.
कोल्हापूर : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली.
सचिन दौलत जोगम (वय ३०, रा. कणेरकरनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, ता. राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे (२५, रा. मराठा बोर्डिंग हाउस, दसरा चौक, कोल्हापूर, मूळ गाव- यल्लाम्मा चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), प्रकाश लक्ष्मण गोते (२५, रा. राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, जि. कोल्हापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या व साहित्य, असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात २,३०० रुपयांना इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने बागल चौक परिसरात जयराज पेट्रोल पंपाशेजारी सापळा लावला. त्यावेळी सचिन जोगम व प्रणव खैरे या दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या मिळाल्या.
चौकशी करताना त्यांच्या रॅकेटमध्ये प्रकाश लक्ष्मण गोते हाही असल्याचे लक्षात आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.नि. तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने केली.
...असे होते तिघांचे रॅकेट कार्यरत
अटक केलेल्यातील सचिन जोगम हा बागल चौक परिसरातील एका मेडिकल दुकानात नोकरीस आहे. ज्या लोकांना रेमडेसिविर औषधांची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी तो काळ्याबाजाराने जादा दराने उपलब्ध करून देत होता. त्याचा सहकारी प्रणव खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो बेलबाग, मंगळवार पेठेतील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहे, तर दुसरा सहकारी प्रकाश गोते, हा शिवाजी उद्यमनगरातील एका ट्रस्टच्या रुग्णालयात नोकरीस आहे. प्रकाश व प्रणव हे दोघे आपल्या रुग्णालयातील रेमडेसिविर हे औषध सचिन जोगम याला पुरवत होते व सचिन हा गरजूंना जादा दराने विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
रुग्णालयातील शिल्लक रेमडेसिविर २,३०० रुपयांना
प्रणव व प्रकाश हे दोघेही नोकरी करत असलेल्या रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करताना शिल्लक राहिलेली रेमडेसिविर औषधे जादा दराने सचिन जोगम यास विकत होते व सचिन हेच औषध तब्बल २,३०० रुपयांना विकत असल्याचे निष्पन्न झाले.
सलग दुसऱ्या टोळीचा पर्दाफाश
पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रेमडेसिविर औषध काळ्याबाजारात विक्री करणारी चौघांची टोळी निष्पन्न करून ती गजाआड केली होती. त्यामध्ये औषध कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजरसह औषध दुकानात नोकरीस असलेल्यांचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यानंतर ही तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला.