उर्वरित आयुष्य धनगर आरक्षणासाठी खर्ची: गणपतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:38 AM2018-04-16T00:38:10+5:302018-04-16T00:38:10+5:30

The remaining time spent for Dhangar reservation: Ganpatrao Deshmukh | उर्वरित आयुष्य धनगर आरक्षणासाठी खर्ची: गणपतराव देशमुख

उर्वरित आयुष्य धनगर आरक्षणासाठी खर्ची: गणपतराव देशमुख

googlenewsNext


कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते.
येथील शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी दुपारी धनगर समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि धनगरी लोकसंस्कृती सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या हस्ते देशमुख यांचा सन्मानचिन्ह, शाल, घोंगडे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, आमच्या समाजाचे अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्न आहेत. हा समाज मागास आहे. जे शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही; म्हणूनच या प्रश्नासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालणार आहे.
यशवंत युवा सेनेचे अध्यक्ष विवेक कोकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. बाबूराव हजारे, सहायक पोलीस निरीक्षक जानकर, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा काळबाग, डॉ. दीपक शेंडगे, सुधाकर बदरणे यांच्यासह धनगर समाजातील कर्तबगारांचा सत्कार केला. अमरसिंहराजे बारगळ, भूषणसिंह होळकर, रेणुका शेंडगे, प्राचार्य शिवाजीराव दळणार, बबन रानगे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, सुलोचना नाईकवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
धनगरी ढोलांनी मुंबई घुमणार
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. आरक्षणासाठी म्हणून २0१४ साली आम्ही सरकार बदलण्यासाठी साथ दिली. मात्र सरकारने केवळ चर्चा करण्याशिवाय काहीही केले नाही. प्रत्येक बैठकीमध्ये आरक्षणाला मुद्दा जोरदारपणे मांडत होतो; पण आता मला बैठकीलाच बोलवायचे बंद केले आहे. मात्र आता आरक्षणासाठी मुंबईत असे काही ढोल बडवू की त्यांचा आवाज घुमेल आणि तो मंत्रालयापर्यंत जाईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला. हे सरकार खाली खेचण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना याचा जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.
धनगरी संस्कृतीचे दर्शन
रविवारी दुपारी शाहू स्मारक परिसरात धनगरी संस्कृतीचेच दर्शन घडले. उचगाव येथील मंगोबा ओवीकर मंडळाने सादर केलेल्या ओव्या, शाहीर डॉ. अमोल रणदिवे यांनी सादर केलेला अहिल्यादेवींचा पोवाडा, आटपाडी येथील बिरूदेव गजी मंडळ निंबवडे यांचे गजीनृत्य यांमुळे वातावरण जल्लोषी बनले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी शाहू स्मारक भवन दुमदुमून गेले.

Web Title: The remaining time spent for Dhangar reservation: Ganpatrao Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.