उर्वरित काम प्राधिकरण करणार
By admin | Published: May 13, 2016 12:39 AM2016-05-13T00:39:31+5:302016-05-13T00:53:14+5:30
सांगली-कोल्हापूर रस्ता : टोलबाबत संभ्रम; मूल्यमापनाची जबाबदारी ‘सार्वजनिक बांधकाम’कडे
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्याचे उर्वरित काम गतीने होणार आहे. प्राधिकरण शिल्लक कामांसह पूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण करणार आहे. झालेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. मूल्यमापनानंतर शासनाकडून पैसे दिल्यानंतर ठेकेदार सुप्रीम कंपनीला बाजूला करण्यात येणार येईल. दरम्यान, त्या रस्त्यावरील टोल जाणार की चालू राहणार याबद्दल सध्या संभ्रमावस्था आहे. कोल्हापूर-सांगली या रस्त्याची एकूण लांबी ५२.६१ किलोमीटर असून, हा रस्ता ‘बांधा, वापरा, हस्तातंरित करा’ या तत्त्वावर करण्याचा ठेका सुप्रीम कंपनीला दिला, परंतु करारातील नियमानुसार मुदतीमध्ये कंपनीने रस्ता पूर्ण केला नाही. रस्ताकामाच्या दर्जाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुप्रीम कंपनीच्या ठेक्यातील मूळ आराखड्यात रस्त्याचा काही भाग दुपदरीकरणाचा आहे.
मात्र, आता महामार्ग प्राधिकरणाकडे गेल्यामुळे पूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी पुन्हा भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हा रस्ता प्राधिकरणाकडे रीतसर सुपूर्द केल्यानंतर काम गतीने होणार आहे, हा वाहनधारकांच्या दृष्टीने फायद्याचा भाग आता समोर आला आहे. मात्र, टोल राहणार की जाणार याबद्दल प्रचंड कुतूहल आहे.
त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. टोल वसूल होणार नाही, टोलचा झोल वाढेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच ते ठरविणार, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर टोलचा विषय समोर आणला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
माहिती देतानाही भीती...
प्राधिकरणाकडे रस्ता सोपविल्याने कंपनी काय करणार, अशी सुप्रीम कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे ‘लोकमत’ने विचारणा केली. परंतु, ‘शासनाकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे आताच काही यावर बोलणार नाही,’ असे उत्तर मिळाले. बांधकाम विभागातील संबंधित अधिकारीही धाडसीपणे माहिती देण्यास तयार नाहीत. त्यामुळे माहिती जाहीरपणे न सांगण्याइतपत कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.