प्रदूषणावर उपाय मूर्ती परत घेण्याचा!

By admin | Published: August 25, 2016 12:19 AM2016-08-25T00:19:04+5:302016-08-25T00:50:33+5:30

मूर्तिकार संघाचा पुढाकार : मंडळांच्या मूर्तिदानला पर्याय; विसर्जनानंतर योग्य पावित्र्यही राखण्यात हातभार

The remedy for pollution to take back the idol! | प्रदूषणावर उपाय मूर्ती परत घेण्याचा!

प्रदूषणावर उपाय मूर्ती परत घेण्याचा!

Next

कोल्हापूर : वाढत्या प्रदूषणामुळे पंचगंगा नदी, इराणी खण असे गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्याय कमी पडू लागले आहेत. सामाजिक संघटनांच्या मूर्तिदानाच्या हाकेला सार्वजनिक मंडळेही प्रतिसाद देऊ लागली आहेत. मात्र, यात मूर्ती विसर्जनानंतर काही वेळेस तीची योग्य ती विल्हेवाट लागत नसल्याचे काही ज्येष्ठ मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून कोल्हापुरातील गणेश मूर्तिकारांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती परत घेण्याची तयारी दर्शविली आहे. काही मंडळांनी असा उपक्रम राबविलाही आहे.
गणेशोत्सव म्हटले की, हजारो गणेशमूर्तींचे आगमन आणि अकरा दिवसांचा मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. मात्र, विसर्जनानंतर प्लास्टरच्या मूर्ती व त्यावरील रासायनिक रंग यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. या सर्वांचा विचार करून गेल्या काही वर्षात सामाजिक संघटनांच्या मदतीने मूर्तिदानचा स्तुत्य उपक्रम वाढत आहे. हा पर्याय आता सर्वमान्यही होऊ लागला आहे; पण या पर्यायात मूर्तिदान केल्यानंतर तिची योग्य ती विल्हेवाट लावली जात नसल्याची खंत कांही मूर्तिकारांची आहे. विशेष करून सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती दान केली की, तिची विल्हेवाट महापालिका किंवा तत्सम यंत्रणा व्यवस्थित पार पाडत नाहीत, ही बाब या मूर्तिकारांच्या पाहणीत आढळून आली.
एक मूर्ती संपूर्ण रंगकामासहित तयार करण्यासाठी किमान पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी लागतो. यात नक्षीकामावर मूर्तिकार अफाट कष्ट घेतो. यासह मूर्ती दान केल्यानंतर काही व्यावसायिक त्या मूर्तीचे पॅटर्न तयार करतात. त्यामुळे पॅटर्नची चोरीही होते. त्यामुळे मूर्ती परत केल्यास त्यांची डागडुजी व रंगरंगोटी केल्यानंतर अन्य मंडळांना ही मूर्ती देताही येते. या सर्व बाबींचा फायदा या उपक्रमात होणार आहे.


या मंडळांचा आदर्श
कोल्हापुरातील राजारामपुरी येथील जिद्द युवक संघटना हे मंडळ गेल्या २० वर्षांपासून आपली गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर विधीवत पूजा करून पुन्हा मूर्तिकारांकडे आणून देत आहे. याशिवाय जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथील नो मर्सी गु्रपने गेल्या वर्षी ११ फुटी गणेशमूर्ती मूर्तिकार श्रीकांत माजगावकर यांच्याकडे परत दिली आहे. या मूर्तीची रंगरंगोटी व डागडुजी करून ही मूर्ती यंदा अन्य मंडळास देण्यात आली आहे.
विसर्जन कुंड हवेत
मूर्तीचे योग्य विसर्जन होेण्यासाठी बेळगाव, बंगलोर, आदी ठिकाणी मोठ्या मूर्तींसाठी पाण्याचे कुंड बनविले जातात. कोल्हापुरातही अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.


विसर्जनानंतर मूर्तींची विल्हेवाट योग्यरीत्या होत नसल्याने काही वेळा भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. याकरिता गणेशोत्सवाच्या किमान सहा महिने अगोदर सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन कशा प्रकारे योग्य विसर्जन करावे, यावर चर्चा करणे गरजेचे आहे.
- सर्जेराव निगवेकर, ज्येष्ठ मूर्तिकार
मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते. त्यासाठी मूर्तिदान करा म्हणून काही मंडळे, संस्था पुढे येतात; पण त्यांच्याकडून योग्यरीत्या विसर्जन होत नाही. त्यामुळे आमच्याकडे या मूर्ती विसर्जनानंतर सोपविल्यास आम्ही त्यांची योग्य ती सोय करू.
- संभाजी माजगावकर, अध्यक्ष, मूर्तिकार संघटना
मूर्तिदाननंतर जमलेल्या मूर्तींचे विसर्जन योग्यरीत्या होत नाही. त्यामुळे मंडळांनी विसर्जनानंतर मूर्ती ज्या त्या मूर्तिकारांकडे सोपवाव्यात. त्या मूर्ती अन्य मंडळांना पुढील वर्षी हव्या असतील तर आम्ही देऊ. मूर्ती जास्त भग्न असेल तर योग्य त्या पद्धतीने विसर्जनही आम्हीच करू. यातून प्रदूषणाचा मोठा प्रश्नही
सुटेल.
- श्रीकांत माजगावकर, ज्येष्ठ मूर्तिकार



जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथील नो मर्सी गु्रपने कोल्हापुरातील ज्येष्ठ मूर्तिकार श्रीकांत माजगावकर यांच्याकडे विसर्जनानंतर परत केलेली ११ फुटी गणेशमूर्ती डागडुजीनंतर दुसऱ्या मंडळात विराजमान होण्यास सज्ज झाली आहे.

Web Title: The remedy for pollution to take back the idol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.