जसे घडले तसे आठवते - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:28+5:302021-09-25T04:23:28+5:30

“आत येऊ का साहेब’’ या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. आवाज नेहमीचा नव्हता. थोडा पोलिसी थाटाचा होता. समोरच्या पत्रांच्या ...

Remember what happened - Part 2 | जसे घडले तसे आठवते - भाग २

जसे घडले तसे आठवते - भाग २

Next

“आत येऊ का साहेब’’ या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. आवाज नेहमीचा नव्हता. थोडा पोलिसी थाटाचा होता. समोरच्या पत्रांच्या ढिगाऱ्यातून मी मान वर केली. समोर खरोखरीच एक पोलीस उभा होता. आत येण्याची परवानगी मागत होता.

“या, या ना” मी केबिनमध्ये शिरता शिरतांच त्यांनी माझ्याकडे पाहून एक कडक सॅल्युट ठोकला. साहेब. ”तो अदबीने म्हणाला“ मी अँटीकरप्शन ब्युरोकडून आलोय. आपणास हे पत्र द्यायचंय”.

मी पत्र हातात घेतले. तो गोपनीय सील केलेला लखोटा होता. मी नाव पाहिले. आमच्या साहेबांच्याच नावे होता.

“साहेब. येतो मी. एक विनंती होती."

“कोणती?"

"हा लखोटा अँटी करप्शन कार्यालयाचा गोपनीय आहे. तो आपणाला फोडता येणार नाही. आपल्या साहेबांनीच तो फोडणे जरुरी आहे."

“आपण म्हणता ते बरोबर आहे. पण या कार्यालयात बाहेरून कोणत्याही कार्यालयांतून आलेले सीलबंद गोपनीय त्रखोटे फोडण्याचे अधिकार कार्यालयीन अधीक्षक या नात्याने साहेबांनी मला प्रदान केलेत.” माझ्या समोरच्या टपाल पत्रांच्या ढिगाऱ्यातून मी फोडलेले दोन-तीन गोपनीय लखोटे व त्यातील पत्रे मी त्यांना दाखवली. “पण साहेब हा एसीबीचा लखोटा आपणास फोडता येणार नाही. तो आपल्या साहेबांनीच फोडायला हवा. हवंतर घेऊन चला तो लखोटा साहेबांकडे.”

“ठीक आहे”असे म्हणून आम्ही दोघेही साहेबांकडे गेलो. “साहेब, हे एसीबी कडून गोपनीय पत्र घेऊन आलेत.” साहेबांनी वर मान करून पाहताच पोलिसाने एक कडक सॅल्युट ठोकला.

“काय म्हणताहेत” साहेब. “त्यांनी एक सील केलेला लखोटा आणलाय.”

“पाहू" साहेबांनी तो लखोटा माझ्या हाती ठेवला. “फोडा”

"नाही सर.” ते पोलीस हवालदार म्हणाले “हा लखोटा यांना फोडता येणार नाही. तो फक्त आपणच फोडू शकता. साहेबांची आज्ञाच आहे तशी.”

"हरकत नाही.” साहेब म्हणाले “आणा तो लखोटा इकडे” असं म्हणून त्यांनी तो सीलबंद लखोटा फोडला. स्वतःच्या हातांनी फोडलेला पोलीस हवालदारांनी पाहिला. "साहेब येतो मी” असे म्हणून ते पाठमोरे झाले देखील. “या केसची कागदपत्र पाहा आणि उत्तर तयार करा” असे म्हणून त्या पत्रावर साहेबांनी स्वहस्ताक्षरांत सही व दिनांक नोंदला.

त्या केसचे कनिष्ठ कार्यालयाकडून आलेले सर्व कागदपत्र मी साहेबांसमोर ठेवले आणि त्याच सायंकाळी साहेबांनी एसीबीच्या गोपनीय पत्रांतील सर्व मुद्यांवर स्वहस्ताक्षरांत उत्तरही तयार करून माझ्या हाती सोपवले. टंकलेखनाला जी कागदपत्रे द्यायची त्या पत्रावर मी नेहमी टी-१. टी-२ अथवा टी-३ अशी नोंद करून तीन टंकलेखकाकडे पत्रे पाठवावीत असे त्या दिवशी घाई गडबडीत एसीबीच्या गोपनीय पत्राला साहेबांनी स्वहस्ताक्षरांत लिहिलेल्या उत्तराच्या पत्रावर मी नेमक्या टंकलेखकाचा उल्लेख मार्किंग करायचं विसरून गेलो. फक्त शिपायाला सांगून कोणाकडूनही अर्जंट टंकलिखित करून आण असा मी तोंडी निरोप दिला. हा सारा प्रसंग खडानखडा मला जसाच्या तसा आठवला.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सरकारी वकिलांच्या चेंबरमध्ये हजर झालो. माझी ओळख करून दिली. “हां. त्या लांडग्याच्या केसची सुनावणी आहे. मी फक्त दोनच प्रश्न विचारेन.. पहिला म्हणजे तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हा गोपनीय सील केलेला लखोटा फोडला काय? आणि दुसरा म्हणजे या पत्राला साहेबांनी लिहिलेले उत्तर आपण पाहिलेत काय? या दोन्हींची उत्तरे 'नाही' आणि 'माहीत नाही' अशी द्या. बाकी काही बोलू नका”

Web Title: Remember what happened - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.