जसे घडले तसे आठवते - भाग ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:30+5:302021-09-25T04:23:30+5:30
“मी माहिती काढलीय सारी" सरकारी वकीलसाहेब म्हणाले "तुम्हाला कुणीतरी यात संबंध नसताना गोवण्याचा प्रकार केलाय. तुमच्या पेन्शनवर गदा यावी ...
“मी माहिती काढलीय सारी" सरकारी वकीलसाहेब म्हणाले "तुम्हाला कुणीतरी यात संबंध नसताना गोवण्याचा प्रकार केलाय. तुमच्या पेन्शनवर गदा यावी म्हणून. जा तुम्ही कोर्टात थांबा.” पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी कोर्टात पाऊल टाकले. पाहतो तो काय? मी सेवेत असताना कामचुकारपणा करणारे, कर्तव्यात हयगय करून प्रकरणं जाणूनबुजून पेंडिंग ठेवणारे तिथं आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह उपस्थित होते. माझी आज चांगलीच गंमत होणार, माझ्यावर बालंट येणार या कल्पनेने संभाव्य मजा पाहण्यासाठी जाणीवपूर्वक हजर होते. ठीक अकरा वाजता न्यायाधीश साहेब आले. आरोपी लांडगे लाकडी पिंजऱ्यात मांडी घालून बसला होता. तोदेखील माझी मजा पाहायला आलेल्यांना आतून सामील होता. सरकारी वकील, आरोपीचे वकील गप्पा मारत एकदमच आंत आले. कोर्टाच्या क्लार्कने आजचं प्रकरण जज्जसाहेबांसमोर ठेवले. त्यांच्या सूचनेनुसार शिरस्तेदारानं माझे नाव पुकारले. मी उभा राहून जज्जसाहेबांना वाकून नमस्कार केला. “पिंजऱ्यात उभे रहा” त्यांनी हुकूम दिला. मी आज्ञेचं पालन केलं. “सरकारी वकील, आपले प्रश्न विचारा.”
“हा लखोटा जेंव्हा एसीबीचा शिपाई घेऊन आपल्याकडे आला तेंव्हा तुम्ही तो गोपनीय लखोटा फोडलांत खरं आहे?”
“नाही, तो लखोटा मी फोडला नाही.” मी. “मग कोणी फोडला?” पुढचा प्रश्न, “आमच्या साहेबांनी. एसीबीच्या हवालदारांसमक्ष.”
“त्या पत्राचं उत्तर कोणी लिहिलं?”
“खुद्द साहेबांनी. कारण पत्र व मजकूर गोपनीय होता.”
“पण ते पत्र टंकलेखनाला आपणच टंकलेखकाचे नांव मार्किंग करून दिले असेल त्यावेळी वाचायला मिळाले असेलच?”
“प्रश्नच उद्भवत नाही. ते पत्र कोणत्या टंकलेखकांकडे परस्पर कोणी पाठवलं मला माहीत नाही.”
दॅट्सऑल मिलाॅर्ड, त्या पत्राची स्वीकृती, लखोटा फोडणे, उत्तराचं मार्किंग करून टंकलेखकाला देणे यात यांचा काहीही संबंध आलेला दिसत नाही. हे मूळ कागदपत्रं असे म्हणून संपूर्ण प्रकरण वकिलसाहेबांनी माननीय जज्जसाहेबांसमोर अवलोकनार्थ ठेवले. त्यांनी त्यातील पानन पान चाळून पाहिले. वर मान करून मला म्हणाले “तुम्ही जाऊ शकता. तुमचा काहीही संबंध दिसत नाही."
“थँकयू सर” असं म्हणून मी पिंजऱ्याच्या बाहेर येऊ लागलो एवढ्यात "सर मला यांची उलट तपासणी घ्यायचीय”.
"माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. माझी मजा, माझी भंबेरी पाहण्यासाठी जमलेल्या मंडळीत हास्याची खसखस पिकली.’’ यू मे प्रोसिड जज्जसाहेबांनी आरोपीच्या वकिलाला मंजुरी दिली.
“हे पहा” मला विचारीत आरोपीचे वकील म्हणाले “मघाशी तुम्ही दिलेली उत्तरे साफ खोटी आहेत."
“नाही साहेब, ती पूर्णपणे सत्य आहेत.”
“अहो. आरोपी तुमच्या ऑफिसमध्ये काम करतोय आणि आपणांस ते पत्र. त्याचे उत्तर, कुणी लिहिलं, कुणाकडून टंकलिखित करून घेतले हे माहीत नाही म्हणता, हे खोटं आहे.”
“मी मघा सांगितलेली वस्तुस्थिती शंभर टक्के खरी आहे. मात्र, आपण म्हणता त्याप्रमाणे आरोपी आमच्या ऑफिसमध्ये नाही.”
“मग कुठं?” प्रतिप्रश्न. “आमच्या ऑफिसच्या पलीकडील कनिष्ठ कार्यालयांत त्याला ज्या कामासाठी लाच स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहात पकडले, त्याचा संबंध फक्त कनिष्ठ कार्यालयाशी आहे. आमचा वा आमच्या कार्यालयाचा त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही.”
“ऑफिसमध्ये शिरल्यावर तुमच्या साहेबांची केबिन डाव्या बाजूस आहे.”
“चूक, ती उजव्या बाजूस आहे” मी.
“आपली केबिन साहेबांच्या केबिनला लागून आहे”
“साफ खोटं, माझी केबिन खूप आतल्या बाजूला आहे. नंतर समक्ष येऊन पडताळून पहा." आरोपीला रंगेहात पकडलं गेलं ते तुम्हाला तुमच्या केबिनच्या खिडकीतून दिसलं?”
“नाही, या प्रसंगाचं वर्णन केलेलं ठिकाण आणि माझ्या केबिनची खिडकी यामध्ये अन्य कार्यालयाच्या तीन भिंती आहेत.”
“ओह, आयसी ”सरकारी वकील म्हणाले “ मग तुम्हाला इथे कशाला बोलावलं? आपला या केसशी काही संबंध दिसत नाही. मला जी माहिती मिळाली ती पूर्ण खोटी आणि बनवेगिरीची आहे असं दिसतयं. केवळ तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं केलेला खोडसाळपणा दिसतोय. मिलोर्ड नो मोअर क्वेश्चन्स प्लीज. जाऊ दे त्यांना.”
“आपण जाऊ शकता.”
“थॅंक्यूमिलॉर्ड” असं म्हणून मी पिंजऱ्यातून पायउतार झालो. माझी गंमत पाहायला आलेल्या हितचिंतकांकडे मी एक रुंद हास्य फेकले नि कोर्टाच्या बाहेर उभ्या केलेल्या टू व्हीलरला कीक मारली.
- बंडा यज्ञोपवित