टोल रद्दची अधिसूचना काढा
By Admin | Published: December 17, 2015 01:04 AM2015-12-17T01:04:22+5:302015-12-17T01:23:09+5:30
कृती समिती : संयमाचा अंत न पाहण्याचा इशारा; धरणे आंदोलनास उत्स्फू र्त प्रतिसाद
कोल्हापूर : लोकशाहीत लढा करायचा म्हटले की, प्रश्न सुटेपर्यंत संयम राखावा लागतो, तो आम्ही आतापर्यंत राखला आहे. परंतु, जनतेच्या मनात काय खदखदतंय हे ओळखून आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरात लवकर शहरातून टोल कायमचा रद्द केल्याची अधिसूचना काढावी, अशी अपेक्षा बुधवारी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एकदिवसीय धरणे आंदोलनाची सांगता केल्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासमोर प्रा. पाटील बोलत होते. कोल्हापूर शहरातील टोलविरोधी आंदोलनाची दखल घेऊन हा टोल रद्द करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरअखेर अधिसूचना काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनतेला दिले आहे. तथापि, आता अधिसूचना काढण्यास होत असलेल्या विलंबामुळे कृती समिती कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्याकरिता बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. आंदोलनाची सुरुवात सकाळी ११ वाजता झाली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व स्वातंत्र्यसैनिक आदगोंड पाटील यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, वकील संघटना, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला. महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक व युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास यांनीही आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या मंडपात धरणे धरलेल्या कार्यकर्त्यांनी भाषणे करून टोल रद्दची अधिसूचना तातडीने काढावी. आता शहरवासीयांचा जास्त काळ अंत पाहू नये, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी कृती समिती निमंत्रक निवासराव साळोखे, बाबा इंदुलकर, चंद्रकांत यादव, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, विवेक घाटगे, आदिल फरास, दिलीप देसाई, ‘गोशिमा’चे अध्यक्ष देवेंद्र दिवाण, दीपाली पाटील, बंकट थोडगे, जयकुमार शिंदे, बजरंग शेलार, लाला गायकवाड, अशोकराव साळोखे, सुरेश जरग, आदींची भाषणे झाली. तसेच यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, बाबा पार्टे, सुभाष सावंत, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
सायंकाळी साडेचार वाजता धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी
डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना एक निवेदनही देण्यात आले. त्याचे वाचन निवासराव साळोखे यांनी केले. याचवेळी सरकारवर असणाऱ्या नैतिक व सामुदायिक जबाबदारीची जाणीवही करून देण्यात आली.
टोल कायमस्वरूपी रद्द करून ‘आयआरबी’ कंपनीचे देणे भागविण्याचे वचन मंत्रिमहोदयांनी दिले आहे. परंतु, ही प्रक्रिया चार महिने प्रलंबित राहिली असल्याने जनतेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने टोलमुक्तीचा तत्वत: निर्णय घेतला असल्याने जनतेची फार मोठी अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अधिसूचना काढून जटिल प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ( प्रतिनिधी)
किती वेळा चर्चा ?
सरकारशी आम्ही अनेकवेळा चर्चा केली; पण चर्चा करायची म्हणजे किती वेळा करायची, असा आमचा सवाल आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज प्रशासन चांगल्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवेल, अशी व्यवस्था आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला भेटून सरकारला अधिसूचना काढण्याची आठवण करून द्यावी, अशी विनंती करायला आलो आहोत, असे प्रा. एन. डी. पाटील म्हणाले.
‘आयआरबी’ पुन्हा रंगरंगोटी करील
रस्त्यांचे पुनर्मूल्यांकन झाल्याशिवाय आंदोलनाचा शेवट होणार नाही, याची आम्हाला जाणीव होती. म्हणून पुनर्मूल्यांकन होईपर्यंत आम्ही मौन धारण करून बसलो; पण आता पुनर्मूल्यांकन झाले आहे. प्रकल्पाची किंमत निश्चित झाली, तरीही सरकारी पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘आयआरबी’ पुन्हा एकदा टोलनाक्यांवर रंगरंगोटी करील, अशी आमच्या मनात शंका आहे; म्हणूनच आता आंदोलन सुरू करावे लागत आहे, असे प्रा. पाटील म्हणाले.
कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक टोलविरोधी आंदोलनात पूर्वीपासून आघाडीवर आहेत, उद्याही असतील. राज्य सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आता टोल कायमचा रद्द केल्याचा अध्यादेश काढावा. शहर टोलमुक्त करावे.
- अश्विनी रामाणे, महापौर
‘हलगी’ने फुलविला उत्साह
आंदोलनस्थळी ‘देणार नाही, देणार नाही, टोल आम्ही देणार नाही’ अशी घोषणा देण्यात येत होती. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आंदोलन पुन्हा सुरू झाल्यामुळे कार्यकर्त्यांत मोठा उत्साह दिसून आला. घोषणांच्या साथीला हलगीच्या ठेक्यानेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. वाशी (ता. करवीर) येथील अशोक लोखंडे यांनी अधूनमधून हलगीवादनाद्वार चैतन्य निर्माण केले.