अतिक्रमणे २४ जूनपर्यंत काढून घ्या - महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:52 AM2019-06-14T00:52:49+5:302019-06-14T00:53:21+5:30
अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला. ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त गुरुवारी दिले होते व समिती अतिक्रमणे कधी हटवणार अशी विचारणा केली होती. त्यानुसार समितीने तातडीने ही बैठक घेतली.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात ओवऱ्यांवरील दुकानदार व देवस्थान समिती पदाधिकारी, अधिकारी यांच्यात अतिक्रमणांसंबंधी गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जाधव म्हणाले, वर्षानुवर्षे ओवºयांवरील दुकानदार येथे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे देवस्थान समिती व आपल्यामध्ये सुसंवाद असू दे. आपले पिढ्यान्पिढ्यांचे संबंध आहेत. कटुता येईल असे वर्तन करू नका. देवस्थान ही सरकारची मालकी आहे. त्यामुळे साहजिकच येथील सर्व कारभार शासनामार्फत होत आहे. अनेकदा परगावांहून येणाºया भाविकांना अडचण होईल असे वर्तन केले जाते.
यात अनेकदा भाविकांची फसवणूकही होते. अनेक दुकानदारांनी आपल्या ताब्यात असलेल्या दुकानाबाहेर येऊन पत्र्याचे शेड मारले आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. ही पत्र्याची शेड दुकानदारांनी येत्या २४ जूनपर्यंत स्वत:हून काढून घ्यावीत; अन्यथा देवस्थान समिती ती काढेल. त्याशिवाय जी कारवाई होईल, त्यास सामोरे जावे लागेल. मंदिराच्या आवारात प्रथम भाविकांची सोय पाहिली जाईल. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव व दुकानदारांतर्फे शीतल मेळवंकी, वृषाली सासने, विश्वनाथ मेवेकरी, भारती जाधव-मेवेकरी, अमित जाधव, श्रीकांत खत्री, सुजय खांडके, सुयोग खटावकर, आदी उपस्थित होते.
देवीला वाहिलेल्या दागिन्यांतही खोट
करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला राज्यासह परराज्यांतून येणाºया भाविकांपैकी अनेक भाविकांनी वाहिलेले सोन्याचे दागिने बेंटेक्सचे, तर चांदीची जोडवीही व्हाईट मेटलची असल्याचे दिसून आले. देणगी पेटीतून या दागिन्यांची मोजदाद करताना अनेकदा खोटेच दागिने आढळल्याने अनेकदा तपासणारा सोनारही कंटाळतो, असेही मत एका ज्येष्ठ सदस्याने अनौपचारिक गप्पा मारताना व्यक्त केले.
सूचना अशा
प्रसादाचे दुकान असल्यामुळे ते शटरपासून दिसू दे.
देवीला वाहण्यात येणारी साडी सहावार असू दे. ती जर तीनवार आढळली, तर अशी दुकाने तत्काळ सील करू
न्यायालयात जाण्याची भाषा केल्यास, चोख प्रत्युत्तर देऊ
चुकीची प्रथा, अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.
इमिटेशन ज्वेलरीची दुकाने लवकरात लवकर बंद करावीत.
गरुड मंडपालगतचे लॉटरी सेंटर २० जूनपर्यंत हलवावे.