सीपीआरमधील अतिक्रमण काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:44+5:302021-06-16T04:31:44+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सुरू केलेल्या चहाच्या टपऱ्या काढाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि ...
कोल्हापूर : येथील सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सुरू केलेल्या चहाच्या टपऱ्या काढाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि शहर वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य सतीश पाटील यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयात त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, तातडीने अतिक्रमण काढावे, अशी मागणी अधिष्ठाता एस. एस. मोरे यांच्याकडे त्यांनी केली.
सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात १४ ते १५ चहाच्या टपऱ्या आहेत. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनजवळ अनेक महिन्यांपासून त्या टपऱ्या आहेत. टपऱ्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून त्या टपऱ्या काढाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाटील यांनी केली होती. त्यांनी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना अतिक्रमण काढण्यासंबंधी आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने पाटील यांनी अधिष्ठाता कार्यालयात ठिय्या मांडला. त्यांनी अधिष्ठाता मोरे यांच्यांशी चर्चा करून टपऱ्या काढावेत, अशी मागणी केली. मोरे व प्रांताधिकारी नावडकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने पाटील यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत ठिय्या मारून लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात सर्व अधिकारी व्यस्त असल्याने पाटील यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. शेवटी सायंकाळी पाच वाजता त्यांनी आंदोलन मागे घेतले.