बायोमॅट्रीक हजेरीतील त्रुटी दूर करा
By admin | Published: March 11, 2017 12:07 AM2017-03-11T00:07:15+5:302017-03-11T00:07:15+5:30
मनपा कर्मचारी संघ : बुधवारपर्यंत पूर्तता न झाल्यास काम बंद
कोल्हापूर : महानगरपालिकेने बायोमॅट्रीक हजेरी पद्धतीतील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत सर्व कामगारांचा पगार मॅन्युअल पद्धतीने काढावा. ज्या कर्मचाऱ्यांची जानेवारीपासून बायोमॅट्रिकमधील दोषांमुळे गैरहजेरी नोंद होऊन पगार कपात झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांना पगार अदा करावा, अन्यथा बुधवारपासून (दि. १५) सर्व कर्मचारी ‘काम बंद’आंदोलन करतील, असा इशारा पालिका कर्मचारी संघाने शुक्रवारी आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदनाद्वारे दिला.
पालिका प्रशासनाने कामगार, कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी पद्धत सुरू केली आहे; परंतु या पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत कर्मचारी संघाने तक्रार केली होती. त्याअनुषंगाने २ फेब्रुवारीला प्रशासन आणि कर्मचारी संघ प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. यावेळी संघाच्या प्रतिनिधींनी काही मुद्दे लेखी सादर केले होते; परंतु त्रुटींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे २ मार्चला संघाने प्रशासनाला पत्र पाठवून त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांची हजेरी मॅन्युअल पद्धतीने नोंद करून पगार काढावा अशी मागणी केली होती, पण त्याचीही दखल घेतली नाही.
बायोमॅट्रीक पद्धतीमधील दोषामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांची हजर राहूनही गैरहजेरी नोंदविल्या गेल्या. त्यामुळे त्यांचे पगार निघाले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या त्रुटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचा पगार मॅन्युअल पद्धतीने काढावा, ज्या कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासून बायोमॅट्रीक पद्धतीमुळे गैरहजेरी नोंद होऊन पगार कपात झाला आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना पगार अदा करावा. यासंदर्भात १५ मार्चपर्यंत निर्णय झाला नाही तर सर्व कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. संघाचे अध्यक्ष रमेश देसार्इंच्या सहीचे हे निवेदन आहे.
सफाई कामगारांचे आंदोलन
बायोमॅट्रीक हजेरी पद्धतीमुळे काम करूनही गैरहजेरी नोंदविल्या गेलेल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ई-३ या वॉर्डात काम बंद आंदोलन केले. वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन बायोमॅट्रीक मशीन बंद राहतात. जर काम करूनही गैरहजेरी पडणार असेल तर मग काम तरी कशाला करायचे अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना वगळा
पालिकेकडील अग्निशमन, रुग्णवाहिका, शववाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धतीतून वगळावे, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल कदम यांनी निवेदनाद्वारे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. या कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा पंचिंग करण्यापूर्वीच सेवेवर जावे लागते; तसेच ‘आउट’ करतेवेळीही ते सेवा बजावत असतात. वेळेत हजेरी न दिल्याने त्यांची गैरहजेरी पडण्याची शक्यता असल्याचे त्यात म्हटले आहे.