त्रुटी दूर करा, मगच आराखड्याचा अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 12:53 AM2017-06-07T00:53:50+5:302017-06-07T00:53:50+5:30

अंबाबाई मंदिर विकास : थेट पाईपलाईनसारखी स्थिती होऊ नये यासाठी नगरसेवकांची सूचना

Remove the error, then the plan of the plan | त्रुटी दूर करा, मगच आराखड्याचा अंमल

त्रुटी दूर करा, मगच आराखड्याचा अंमल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सर्वसमावेशक असावा. कामांच्या त्रुटी प्रारंभापूर्वीच दूर कराव्यात, महाद्वारमधून भाविकांना प्रवेशबंदी नको, शिवाजी मार्केटची इमारत विकसित करून त्यामध्ये भाविकांच्या वाहनतळाची सोय करावी, आदी सूचना मंगळवारी नगरसेवक व नागरिकांनी मांडल्या.
सुमारे ६८.७ कोटी रुपये खर्चाच्या श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची माहिती महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांना व्हावी, यासाठी महापौर हसिना फरास यांनी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आराखड्याच्या सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यावर सुचविलेल्या सूचना, दुरुस्त्या बदलांचा अंतर्भाव केलेला पहिल्या टप्प्यातील आराखडा आता ९२ कोटींवर गेला आहे. मंदिराच्या चारही दरवाजांच्या आतील परिसराचे जतन, संवर्धन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीने यंदाच्या अंदाजपत्रकात सात कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ही रक्कम महापालिकेच्या विकास आराखड्यातून वगळण्यात आली आहे. हेरिटेज कॉन्झर्व्हेशनची रक्कमदेखील या प्रस्तावातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे शासनदरबारी पहिल्या टप्प्यातील ६८ कोटी ७ लाखांचा आराखडा पाठविण्यात आला आहे. या आराखड्याचे शासनाच्या नगरविकास खात्याकडे शुक्रवारी (दि. ९) सादरीकरण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरसेवकांच्या माहितीसाठी हे सादरीकरण करण्यात आले. या आराखड्याचे सादरीकरण ‘फोरट्रेस’ या सल्लागार कंपनीचे महेंद्र कर्णे यांनी केले. या आराखड्यात शहरातील बिंदू चौक, सरस्वती चित्रमंदिर या दोन ठिकाणी तीनमजली वाहनतळ इमारत तर व्हीनस कॉर्नर येथे भक्त निवास आणि वाहनतळासाठी तीनमजली इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. आराखडा सादरीकरणानंतर अजित ठाणेकर यांनी, आराखडा मंजूर करताना घाईगडबड करू नका, अंबाबाई मंदिर हे पुरातन असल्याने विकासकामे करताना पुरातत्त्व खात्याची परिसरात बांधकामे करता येणार नाहीत, अशी अधिसूचना निघाल्यास पंचाईत होईल; त्यामुळे आराखड्यात बदल करण्यासाठी नियमांची तरतूद करावी, अशा सूचना मांडल्या. व्हीनस कॉर्नर भागात भक्तनिवास व वाहनतळ उभारल्याने परिसरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढणार असल्याची सूचना शेखर कुसाळे यांनी मांडली. अंबाबाई पालखी मार्गाचाही विकास करावा, अशी सूचना किरण नकाते यांनी मांडली. शिवाजी मार्केट विकसित करून ते वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना मा. बनछोडे यांनी मांडली. यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, तसेच नागरिकांनी सूचना मांडल्या.
स्थानिक भक्तांची खास सोय असावी
जयश्री चव्हाण यांनी, रोज दर्शनासाठी सकाळी येणाऱ्या स्थानिक भक्तांचाही विचार करून त्यांच्यासाठी दर्शनाची खास सोय करावी अशी सूचना मांडली. बहुतांश भक्त हे महाद्वार रोडमार्गे येतात; त्यामुळे महाद्वारातून प्रवेशबंदी नसावी अशीही सूचना त्यांनी मांडली.
आराखडा कागदावरच नको
आराखडा हा सर्वसमावेशक, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश असलेला असावा, अशी सूचना भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी मांडल्या. व्हीनस कॉर्नरची इमारत ही भक्त निवास आणि वाहनतळ अशी स्वतंत्र असावी, नगारखाना इमारत, श्री तुळजाभवानी मंदिर, याचाही विकास करावा, अशाही सूचना मांडल्या.
सर्व सूचनांचा विचार करू : आयुक्त
मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आवश्यकतेनुसार बदल करू. सर्वांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करून सर्वसामावेशक आराखडा प्रत्यक्षात राबवू, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले.
थेट पाईपलाईनसारखी अवस्था नको
थेट पाईपलाईनच्या कामाबाबत जे झाले ते अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत होऊ नये त्यासाठी सर्व परवानग्या घेऊन काम सुरू करावे. पुरातत्त्व विभागाच्या अडचणी उद्भवणार असल्याने त्याचा प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना सभागृह नेते प्रवीण केसरकर, भूपाल शेटे, आदिल फरास यांनी मांडल्या.


निधीला कात्री
या आराखड्याला मूर्त स्वरूप येण्याअगोदरच पहिल्या टप्प्यातील निधीला कात्री लावली. सुमारे २५५ कोटींच्या या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी ७२ कोटी प्रस्तावित केले होते; तर त्यामध्ये महापालिकेने मंदिर संवर्धनासाठीच्या तरतुदीत वाढ करून तो खर्चाचा टप्पा ९० कोटींपर्यंत नेला; पण ही तरतूद राज्य शासनाने फेटाळली; त्यामुळे त्यासाठी ६८ कोटींच्या कामांना मान्यता मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

पहिला टप्पा..
कोल्हापूर महानगरपालिकेकडून २५५ कोटींचा प्रारूप विकास आराखडा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार तीन टप्प्यांत करण्यात आला होता. पुणे विभागीय आयुक्त यांनी प्रथम प्राधान्याने करावयाच्या टप्पा क्रमांक १ च्या अंदाजपत्रकीय ६८ कोटी ७ लाखांच्या कामांना मान्यता होण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला आहे. यामध्ये दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन मंडप, उड्डाणपूल, रस्ते सुविधा, वाहनतळ, भक्तनिवास, सुशोभीकरण यांचा समाावेश आहे.
भाविकांना प्रवेश
मंदिरात भाविकांना दर्शन मंडपातून पूर्वेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश मिळेल, तर देवीच्या मुखदर्शनसाठी मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आत जाता येईल. तेथून भक्तांच्या दर्शनवे ब्रिजखालून पुढे मुखदर्शन घेता येईल. याशिवाय दर्शन घेतलेले भाविक पश्चिमेच्या महाद्वारातून महाद्वार रोडकडे बाहेर पडतील.

बिंदू चौक उपकारागृह स्थलांतरित करावे
आराखडा प्रत्यक्षात उतरविताना बिंदू चौक उपकारागृहामुळे कारागृहाचे नियम आडवे येणार आहेत. येथे वाहनतळाची इमारत बांधताना नियमावलीचा फटका बसण्याची शक्यता आहे; त्यामुळे हे उपकारागृह कळंबा कारागृहाच्या पिछाडीस महापालिकेच्या जागेत स्थलांतरित करावे, अशी सूचना गणी अजरेकर, विजय सूर्यवंशी, आदिल फरास आदींनी मांडली.
कामावर लक्ष ठेवण्यासाठी समिती
या विकास आराखड्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे आयुक्त, स्थायी समितीचे
सभापती, इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व
गटनेते व ज्येष्ठ नगरसेवकांची समिती नेमून कामावर लक्ष ठेवून प्रत्यक्षात जाग्यावर होणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना महापौर हसिना फरास यांनी मांडली.


असा असेल आराखडा
बिंदू चौक, सरस्वती चित्रमंदिरानजीक तीनमजली वाहनतळ इमारत, व्हीनस कॉर्नर चौकात भक्त निवास आणि वाहनतळाची एकत्रित तीनमजली इमारत
भक्तांना पूर्वेकडून दर्शनमंडपातून थेट मंदिरात प्रवेश, मुखदर्शनासाठी दक्षिण प्रवेशद्वारातून प्रवेश; तर पश्चिमेकडील महाद्वारमधून भक्त बाहेर पडतील.
बिंदू चौक ते भवानी मंडप (जेल मार्ग) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद
अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व वायरिंंग, गटर्स भूमिगत होणार
महोत्सवावेळी दर्शनास येणाऱ्या सुमारे सव्वा कोटी भाविकांचा विचार करून आराखडा

Web Title: Remove the error, then the plan of the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.