मोदी हटाओ, संविधान बचाओ; कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शने
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 22, 2023 03:41 PM2023-12-22T15:41:17+5:302023-12-22T15:41:51+5:30
सरकारकडून स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम
कोल्हापूर : देशातील मुलभूत प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या १४६ खासदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा गळा चेपण्याचे काम आहे. मोदी सरकारला विरोधक संपवून देशावर हुकुमशाही लादायची आहे.. पण आपण एकजुटीने, शाहूंच्या भूमितून वैचारीक लढा देऊया असा निर्धार करत शुक्रवारी इंडिया आघाडीच्यावतीने बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, संविधान जिंदाबाद, लोकशाहीची हत्या करणारा मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी, भाजप हटाओ देश बचाओ,, अशा घोषणांनी चौक दणाणून गेला.
विरोधी पक्षातील १४६ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, पद्मजा तिवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अविनाश नारकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, व्यंकाप्पा भोसले, शारंगधर देशमुख, ईश्वर परमार, सतिशचंद्र कांबळे, आपचे संदीप देसाई यांच्यासह सहभागी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आपण एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीच्या मंदिरात येऊन आंदोलन करण्याची वेळ तरुणांवर येते याचे आत्मपरीक्षण सरकारने करावे. संसदेत खासदारांना नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. हा प्रश्न फक्त निलंबनाचा नाही तर खासदारांचे निलंबन करून तीन कायदे मंजूर करायेच होते.
विजय देवणे म्हणाले, हा लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रकार आहे. इंडिया आघाडीची एवढी धास्ती घेतली की, सगळ्या विरोधी खासदारांना संसदेबाहेर घालवायला निघाले आहे. मत व्यक्त करणाऱ्यांचे निलंबन हा अजेंडा राबवला जात आहे. हा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार आहे.
व्ही. बी. पाटील म्हणाले, खासदारांनी महत्वाच्या विषयावर करण्याची मागणी केली तर त्यांच्यासह काही अनुपस्थित खासदारांचेही निलंबन केले गेले. उदय नारकर म्हणाले, मोदी आणि भाजपने त्यांचा प्रचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेला दावणीला बांधले आहे. मोदी सरकारने काढलेल्या संकल्प यात्रेला जनतेतून विरोध होत आहे. आपचे संदीप देसाई तसेच शिवाजीराव परुळेकर यांनीही मनोगत मांडले.