शिवाजी पुलाच्या कामावरून आबदार यांना हटवा, कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:09 PM2019-01-24T17:09:48+5:302019-01-24T17:11:39+5:30
पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारे उपअभियंता संपत आबदार यांना त्या कामावरून हटवा; अन्यथा त्यांना पुलावर आल्यास चोप देऊ; यावेळी बिघडणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गुरुवारी दुपारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने काहीवेळ गोंधळ माजविला. याप्रसंगी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारे उपअभियंता संपत आबदार यांना त्या कामावरून हटवा; अन्यथा त्यांना पुलावर आल्यास चोप देऊ; यावेळी बिघडणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गुरुवारी दुपारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने काहीवेळ गोंधळ माजविला. याप्रसंगी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
बैठकीस बोलावूनही उपस्थित न राहता उद्धटपणाची भाषा वापरणारे उपअभियंता आबदार यांच्यावर कारवाईची लेखी शिफारस कांडगावे यांनी मुंबईतील मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे केली.
पुलाच्या कामात अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे अडथळे येत आहेत. उपअभियंता संपत आबदार यांनी ठेकेदाराच्या बिलांमध्ये दुरुस्ती करून ९० लाखांचे बिल फक्त नऊ लाख केले. त्यामुळे ठेकेदारांनी काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. कृती समितीचे शिष्टमंडळ गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आबदार यांच्या कार्यालयात गेले; पण आबदार हे कार्यालयात नसल्याने, कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला.
आबदार यांच्यावर कारवाई करीपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला. काहींनी मुख्य अभियंता देशपांडे यांना फोन करून आबदार यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली. गोंधळातच आबदार यांच्या कार्यपद्धतीबाबत व त्यांना पुलाच्या कामावरून हटविण्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी कृती समिती शिष्टमंडळास दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
आंदोलनात, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, सहनिमंत्रक बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, अशोक भंडारे, विजयसिंह पाटील, स्वप्निल पार्टे, दिलीप माने, सतीशचंद्र कांबळे, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, माई वाडेकर, सुमन वाडेकर, सुनीता राऊत, मीरा मोरे, मंगल कट्टी, आदी सहभागी झाले होते.
‘येत नाही; काय करायची ती कारवाई करा!’
दरम्यान, शिष्टमंडळाशी चर्चा सुरू असताना कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी उपअभियंता संपत आबदार यांना फोन करून चर्चेसाठी येण्यास सांगितले. त्यावेळी आबदार यांनी, ‘येत नाही, काय कारवाई करायची ती करा!’ अशी उद्धट भाषा वापरून फोन बंद केला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
कृती समिती शुक्रवारी पुलावर
उपअभियंता आबदार यांना पुलाच्या कामावरून हटवून ते काम कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी पाहावे यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पुलावर एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले.