‘आयआरबी’ने उभारलेले शेड काढा
By admin | Published: May 30, 2014 01:45 AM2014-05-30T01:45:04+5:302014-05-30T01:57:54+5:30
महापौर महापालिकेची पूर्वपरवानगी न घेतल्याने आदेश
कोल्हापूर : टोलनाक्यांवरील बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना विश्रांतीसाठी ‘आयआरबी’ने टोलनाक्यांवर पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. महापालिकेची पूर्वपरवानगी न घेताच उभारलेल्या या शेड तत्काळ काढून टाकाव्यात, असे आदेश महापौर सुनीता राऊत यांनी आज, गुरुवारी दिले. ‘आयआरबी’कडे पोलीस प्रशासन बंदोबस्त देताना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही आहे.मात्र महापौरांच्या आदेशामुळे टोलविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने फुलेवाडी नाक्याची मोडतोड केल्याप्रकरणी महापौर सुनीता राऊत यांच्यासह ३२ कार्यकर्त्यांना तीन लाख नुकसानभरपाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच जिल्'ात बंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. आंदोलन चिरडण्यासाठीच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ‘आयआरबी’चा हा डाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नोटिसींचा वचपा काढण्यासाठी महापौरांनी ‘आयआरबी’ने टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर नाक्यांवर पोलिसांसाठी उभारलेले पत्र्याचे शेड काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. या शेड उभारणीसाठी ‘आयआरबी’ने महापालिकेची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. यामुळे उद्या, शुक्रवारी महापालिकेतर्फे या शेड काढल्या जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यात आता पावसाळा सुरू होत असल्याने पोलिसांच्या समस्यांत आणखी भरच पडणार आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीसाठी शेड, तसेच शौचालय उभारण्याची मागणी पोलिसांनी ‘आयआरबी’कडे केली होती. यानुसार ‘आयआरबी’ने काल, बुधवारी पोलिसांना बसण्यासाठी टोलनाक्यांवर पत्र्याचे शेड उभारले आहेत. दरम्यान, या शेड उभारण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याने या शेड काढून टाकण्याचे आदेश महापौरांनी आज दिल्याने ‘आयआरबी’ विरुद्ध महापालिका असा नवीन संघर्ष येत्या काही दिवसांत उफाळणार आहे.