गद्दारी करणाऱ्याचे नामोनिशान मिटवा, उद्वव ठाकरे यांचे आवाहन; सतेज पाटील यांच्यावर दिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:24 PM2024-11-06T13:24:35+5:302024-11-06T13:25:37+5:30

सरवडे : पद, प्रतिष्ठा, मानसन्मानही देऊनही त्याने गद्दारी केली. शिवसेना नावाच्या आईच्या छातीवर, पोटावर वार करून त्याने राधानगरीकरांची फसवणूक ...

Remove the name of the traitor from Radhanagari-Bhudargarh Constituency Uddhav Thackeray appeal | गद्दारी करणाऱ्याचे नामोनिशान मिटवा, उद्वव ठाकरे यांचे आवाहन; सतेज पाटील यांच्यावर दिली जबाबदारी

गद्दारी करणाऱ्याचे नामोनिशान मिटवा, उद्वव ठाकरे यांचे आवाहन; सतेज पाटील यांच्यावर दिली जबाबदारी

सरवडे : पद, प्रतिष्ठा, मानसन्मानही देऊनही त्याने गद्दारी केली. शिवसेना नावाच्या आईच्या छातीवर, पोटावर वार करून त्याने राधानगरीकरांची फसवणूक केली. अशा गद्दाराचे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून नामोनिशान मिटवा, असे आवाहन करत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर तोफ डागली.

आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान परिसरातील भव्य पटांगणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची विराट सभा झाली. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार मिलिंद नार्वेकर, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी या मतदारसंघात याआधी चूक केली; पण ती चूक आता सुधारली आहे. पद, प्रतिष्ठा, मानसन्मान दिला त्यानेच गद्दारी केली. शिवसेना नावाच्या आईच्या छातीवर, पोटावर वार करणारा कधीच तुमचा होऊ शकत नाही.

के. पी. पाटील म्हणाले, राधानगरी मतदारसंघाला गद्दारीचा कलंक लागला असून, हा कलंक पुसून काढण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच नेते, कार्यकर्ते, तरुण जोशाने कामाला लागले आहेत. यावेळी मतदारसंघात मशाल पेटवून प्रकाश पाडणारच. पाटगाव धरणाचे पाणी ‘अदानी’ला विकण्याचे काम आबिटकर यांनी केले असून अदानीच्या बगलबच्चा गद्दार आमदाराला पाडूनच मी मुंबईला येणार अशी गर्जना के. पी. पाटील यांनी केली.

सतेज पाटील म्हणाले, के. पी. पाटील यांना ग्रामीण भागातील विकासाची नाळ माहिती आहे. बिद्री साखर कारखाना सक्षमपणे चालवत राज्यात उच्चांकी ऊसदर दिला. उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून अनेक वर्षे काम करणारे या मतदारसंघातील आमदार आता ठाकरे यांच्यावर चुकीचे बोलत आहेत. त्यामुळे या गद्दारांना त्यांची जागा दाखवा.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विजय देवणे, व्ही. बी. पाटील, राहुल देसाई, संजयसिंह पाटील, आर. के. पोवार, सदाशिव चरापले, हिंदुराव चौगुले, श्यामराव देसाई, प्रा. किसन चौगले, प्रकाश पाटील, अभिजित तायशेटे, विश्वजित जाधव, आर. के. मोरे, जयवंत शिंपी, सुनील शिंत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर

सतेज पाटील भाषणाला उभे राहिल्यानंतर समर्थकांनी घोषणा आणि शिट्ट्यांनी परिसर दुमदुमून टाकला. त्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पुढे बोलावून या मतदारसंघातील विजयाची जबाबदारी तुमच्याकडे देत असल्याचे जाहीर केले.

बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते ‘डी’मध्ये

या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जितके लोक मंडपात होते तितकेच लोक बाहेर उन्हात उभारले होते. ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर बाहेर उभारलेल्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: ‘डी’मधील बॅरिकेड्स तोडून प्रवेश केला. त्याला पोलिसांनी अटकाव केला. मात्र, ठाकरे यांच्यासह सतेज पाटील यांनीही या कार्यकर्त्यांना ‘डी’मध्ये बसू द्या, अशी विनंती पोलिसांना केली.

भव्य मोटरसायकल रॅली आणि प्रचंड गर्दी

सभेला येण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी ते आदमापूरपर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढली. त्यानंतर कार्यकर्ते सभास्थळी आले. त्यांच्या मोठ्या उपस्थितीने सभामंडप खचाखच भरून गेला होता. अनेक कार्यकर्ते सभामंडपाच्या बाहेर उभारलेल्या स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण पाहत होते.

Web Title: Remove the name of the traitor from Radhanagari-Bhudargarh Constituency Uddhav Thackeray appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.