‘भोगावती’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा : चरापले
By admin | Published: March 10, 2016 11:15 PM2016-03-10T23:15:14+5:302016-03-10T23:58:18+5:30
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार : कार्यकारी संचालक भ्रष्टाचाराचे मार्गदर्शक
राशिवडे : भोगावती कारखान्यातील भ्रष्टाचारावरील सभासदांचे लक्ष विचलित करण्यासाठीच सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ व कार्यकारी संचालक करत आहेत. कार्यकारी संचालक हेच भ्रष्टाचाराचे मार्गदर्शक आहेत. कारखाना ताब्यात होताना ज्याप्रमाणे श्वेतपत्रिका काढली होती, त्याप्रमाणे सहा वर्षांच्या कारभाराचीही श्वेतपत्रिका काढावी; अन्यथा आम्ही आपल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार आहोतच, असे आव्हान ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी पत्रकार बैठकीत दिले.
चरापले म्हणाले, आमच्या काळात ‘भोगावती’ला आर्थिक शिस्त लावून कार्यक्षमता, उत्पादन खर्च, उतारा याबाबतीत नवीन उच्चांक केले. माझ्या कार्यकाळात ३० ते ४० लाखांची ताडपत्री खरेदी झाली असताना ४६ लाखांचा भ्रष्टाचार कसा? डॅमेज साखर, मोलॅसिस व स्पिरीट विकताना टेंडर पद्धतीनेच उच्चांकी दरानेच विक्री केली. तुम्ही गेल्या सहा वर्षांत भ्रष्टाचाराचा बाजार मांडला म्हणूनच लेखापरीक्षणात तुम्हाला जबाबदार धरले आहे. मोलॅसिस विक्रीतील अन्य कारखान्यांचे जुने दर व ‘भोगावती’च्या या महिन्याच्या दराची तुलना करून सभासदांची दिशाभूल केली जात आहे. हे निदर्शनास आणल्यामुळे संचालक मंडळ माझ्या कारभारावर बोलत आहे.
‘भोगावती’ आमच्यामुळे नाही तर विस्तारीकरणामुळे अडचणीत आला. या विस्तारीकरणाला माझा विरोध होताच; पण माझ्यासोबत विरोध करणारे आज संचालक मंडळात असतानाही असा आरोप म्हणजे मोठा विनोद आहे. (वार्ताहर)
‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे माझ्यावरील व्यक्तिगत आकसापोटी असे आरोप करत आहेत. भ्रष्टाचार पुराव्यानिशी सादर करा. अशा हवेत गोळ्या मारू नका.
- एस. एस. पाटील,
‘भोगावती’चे कार्यकारी संचालक.
निवडणुकीमुळेच आरोप
‘भोगावती’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे राजकीय आरोप करत असून, त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, अशी प्रतिक्रिया ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली.