शक्य तेवढे अडथळे दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:55 AM2017-11-01T00:55:25+5:302017-11-01T00:56:40+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणाºया किरणोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने व महापालिकेच्या सहकार्याने शक्य तितके अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या आठ तारखेपासून अंबाबाईच्या किरणोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य सुभाष वोरा, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी उपस्थित होते.
महेश जाधव म्हणाले, यापूर्वी ‘केआयटी’चे प्रा. किशोर हिरासकर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर यांच्यासह विविध अभ्यासकांनी अंबाबाईचा वर्षातून दोन वेळा होणारा किरणोत्सव आणि त्यात येणारे अडथळे यांचा अभ्यास केला आहे. किरणोत्सवासाठी महाद्वार ते संध्यामठ आणि रंकाळ्याचा पुढील काही भाग ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करावा लागणार आहे. त्याचा डिजिटल नकाशाच्या आधारे अभ्यास करून किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचा तांत्रिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन्यात आली आहे. या अभ्यासकांच्या अहवालानंतर देवस्थान समितीच्या वतीने महापालिकेला हा परिसर ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करण्यासाठी ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली जाईल. महापालिकेत ठराव झाला की तो शासनाला पाठविला जाईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत येत्या आठ दिवसांत देवस्थान व महापालिकेला असलेल्या अधिकारात किरणोत्सव मार्गातील अधिकाधिक अडथळे काढले जातील. मानवनिर्मित अडथळ्यांव्यतिरिक्त हवेतील प्रदूषण, सूर्यकिरणांची तीव्रता कमी असणे अशा कारणांमुळे किरणोत्सव होऊ शकला नाही तर त्याला पर्याय नाही. मंदिराबाहेरील भाविकांनाही किरणोत्सवाचा लाभ घेता यावा, यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
समितीत लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा
या पत्रकार परिषदेनंतर नगरसेवक व श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी देवस्थान समितीकडे किरणोत्सवाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समितीने यापूर्वी केलेल्या पाहणीनुसार काही इमारती किरणोत्सवात अडथळा आहेत; तसेच या मार्गात ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करण्याचे प्रस्तावित आहे. किरणोत्सव मार्गातील बहुतेक इमारती या मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागातील आहेत. समितीने आजवर या प्रभागाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी किंवा नागरिकांना विश्वासात न घेता अभ्यास केल्याचे दिसते; त्यामुळे या प्रकरणात बाधित होणाºया भागाचा प्रतिनिधी म्हणून माझा समितीत समावेश करण्यात यावा.