कोल्हापूरचे आरोग्य: ‘सीपीआर’ कात टाकतंय, चकाचक होतंय; सर्व इमारतींचे होणार नूतनीकरण
By समीर देशपांडे | Updated: January 2, 2025 16:33 IST2025-01-02T16:30:31+5:302025-01-02T16:33:23+5:30
अद्ययावत यंत्रसामग्रीही दाखल

छाया-नसीर अत्तार
गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था कात टाकत आहे. एकीकडे सर्वसामान्यांचा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण होत आहे. शेंडा पार्कमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी झपाट्याने उभारली जात आहे. अनेक ग्रामीण रुग्णालयांमधून मोफत विविध तपासण्या केल्या जात आहे. यासाठीची अद्ययावत यंत्रसामग्रीही दाखल झाली आहे. आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती आणि भविष्याची गरज याचा वेध घेणारी मालिका आजपासून..
समीर देशपांडे
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांना आरोग्यसेवा पुरविणारा ‘थोरला दवाखाना’ अर्थातच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आता कात टाकू लागले आहे. यातील काही इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, त्या ठिकाणी रुग्णही नियमितपणे दाखल केले जात आहेत. हे सर्व काम सध्या येथे असलेले रुग्ण सांभाळून करावे लागत आहे. तरीही दिवाळीपर्यंत सुरू इमारतींचे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली आहे.
‘सीपीआर’ परिसरात एकूण ३३ इमारती आहेत. एक तर ही इमारत हेरिटेज असल्याने येथील विकासकामांवर बंधने येतात. तरीही या इमारतींच्या नूतनीकरणासह, रस्ते, ड्रेनेज दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता; परंतु त्याला जोर लागत नव्हता. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकाच वेळी दोन महत्त्वाची कामे हाती घेतली. एक म्हणजे ‘सीपीआर’चे नूतनीकरण आणि दुसरे म्हणजे शेंडा पार्कमधील इमारतींसह नव्या रुग्णालयांची उभारणी. त्यासाठी त्यांनी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिल्याने शेंडा पार्क आणि ‘सीपीआर’कडील दोन्ही कामे वेगाने प्रगतिपथावर आहेत.
‘सीपीआर’च्या आवारात एकूण ३३ पैकी २१ इमारतींचे नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. यापैकी कान, नाक, घसा विभागाची आणि कैदी इमारत अशा दोन इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. दुधगंगा इमारतीमधील ८ पैकी ४ वॉर्डांचे नूतनीकरण झाले आहे. वेदगंगा इमारतीचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. मेंटल विभागाच्या इमारतीचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. परिचारिका वसतिगृहाचे काम ५० टक्के, तर बाह्यरुग्ण विभागाचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. तुळशीसह एकूण १० इमारतींचे काम मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. तर उर्वरित १० इमारती या दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.
सध्या संपूर्ण कामे ही अंतर्गत असल्याने बाहेरून मोठ्या पद्धतीने काम चालल्याचे लक्षात येत नाही; परंतु आतील कळकट फरशा काढून नव्या परशा घालण्यात आल्या आहेत. उत्तम विद्युतीकरण करण्यात आले असून, स्वच्छता दिसून येत आहे. इमारतींमधील सर्व नूतनीकरणाची कामे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
सुरू असलेली कामे
- जुन्या सर्व फरशा काढणे
- सुस्थितील कोटा फरशांना पॉलिश करणे
- खराब झालेल्या ठिकाणी पुन्हा गिलावा करणे
- गळती रोखण्यासाठी अक्रॅलिक आणि वॉटर प्रूफिंग करणे
- स्टील, एम.एस. ग्रील दरवाजे बसवणे, ॲल्युमिनिअम पार्टीशन, दरवाजे
- लाकडी व सिमेंटच्या चौकटी बसवणे
- सर्व खिडक्यांना जाळ्या बसवणे
- स्वच्छतागृहातील जुनी भांडी, पाइप बदलणे
- ड्रेनेजलाइनचे काम
- रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाइप बदलणे
- कडाप्पांची कपाटे करणे
- पाणीपुरवठ्याचा साठा वाढवणे
दृष्टिक्षेपात सीपीआर इमारत
- सीपीआर प्रारंभ १८८४
- आवारातील इमारती २१
- इमारतींचे क्षेत्रफळ ४१ हजार ५७८ चौरस फूट
- ४३ कोटी ७४ लाख रुपयांच्या दुरुस्ती प्रस्तावास प्रशासकीय मान्यता
- २१ इमारतींचे कामकाज सुरू
- ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर