पंचगंगा स्मशानभूमीत विसावा शेडचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:26 PM2020-02-17T15:26:16+5:302020-02-17T15:27:50+5:30
पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था होत आहे.
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था होत आहे.
करवीर काशीमुळे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला वेगळे महत्त्व आहे. उपनगरांसह आसपासच्या काही गावांमधील मृतदेहांवर येथे अंत्यविधी होतो. दररोज १० ते २० मृतदेहांवर अंत्यविधी होतो. बेडची संख्या कमी असल्यामुळे अंत्यविधीला आलेल्यांना काही वेळेस ताटकळत थांबावे लागते. जागेअभावी स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाला अडचणी आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथे नव्याने सहा बेड तयार केले आहेत.
स्मशानभूमीमध्ये काही विशिष्ट दिवशी रक्षाविसर्जनाला गर्दी होते. त्यामुळे येथील शेड अपुरे पडत होते. शेड जुने झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होत होता. यामुळे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून चांगल्या दर्जाचे विसावा शेड उभारण्यात येत आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू आहे. पूर्वीचे शेड अपुरे होते. दोन नवीन शेड उभारण्यात येत आहेत. तसेच बैठक व्यवस्थाही प्रशस्त आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनाला येणाऱ्यांची बसण्याची चांगली सोय होत आहे.
पंचगंगा स्मशानभूमीला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे फायद्याचा विचार न करता येथील काम करीत आहे. संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, वृक्षलागवड केली जाणार आहे. कामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन टप्प्यांत काम केले जाणार आहे.
- सतीश पाटील, ठेकेदार