कोल्हापूरात उत्साही वातावरणात रेणुका देवीची आंबील यात्रा, मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:12 PM2017-12-09T15:12:02+5:302017-12-09T15:16:49+5:30
पहाटेचा अभिषेक, आरती, पालखी सोहळा, मानाच्या जगांचे पूजन, वडी, भाजी-भाकरीचा नैवेद्य, भंडाऱ्यांची उधळण, भाविकांची अलोट गर्दी खेळण्यांसह विविध साहित्यांच्या दुकानांची रेलचेल अशा मंगलमयी व उत्साही वातावरणात शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची यात्रा पार पडली.
कोल्हापूर : पहाटेचा अभिषेक, आरती, पालखी सोहळा, मानाच्या जगांचे पूजन, वडी, भाजी-भाकरीचा नैवेद्य, भंडाऱ्यांची उधळण, भाविकांची अलोट गर्दी खेळण्यांसह विविध साहित्यांच्या दुकानांची रेलचेल अशा मंगलमयी व उत्साही वातावरणात शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची यात्रा पार पडली.
सौंदत्ती यात्रेनंतर मानाचे जग कोल्हापूरात आले की ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा होते. यानिमित्त शनिवारी पहाटे देवीचा महाअभिषेक करण्यात आला. सालंकृत पूजा बांधल्यानंतर सकाळी सहा वाजता देवीची आरती करण्यात आली. नैवेद्य दाखवण्यासाठी मात्र मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी होती. दुपारी चार वाजता देवीची पालखी काढण्यात आली. मदन जाधव, किसन बेळगावकर यांनी पूजा विधी केले.
भाविकांच्या सोयीसुविधांसाठी रेणूका मंदिर देवस्थान यात्रा समितीच्यावतीने विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. यात्रा का३ळात मंदिरासमोरील होल्डींगवर बंदी घालण्यात आली तसेच पूजेचे साहित्य वगळता अन्य सर्व दुकानदारांना मंदिरापासून ठरावकी अंतरावर जागा देण्यात आली.
महिला व पुरूषांच्या दर्शन रांगामध्ये बॅरीकेटस लावण्यात आल्याने कोठेही गर्दी गोंधळ धक्काबुक्की न होता भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत होते. या रांगांच्या परिसरात कोणतेही स्टॉल्स लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मोकळ््या परिसरात भाविकंना ये जा करता येत होती. दर्शन घेतलेले भाविक मागील बाजूने मैदानात येवून मानाच्या जगांचे दर्शन घेत होते.
दर्शन घेतले ही कुटूंबियांनी सोबत आणलेली वडी भाजी-भाकरी आंबीलचा आस्वाद घेतला. या ठिकाणी करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेसह विविध संघटना व व्यक्तींच्यावतीने सरबत, आंबीलाचे वाटप करण्यात आले.
मंदिर आवारात थोडा वेळ विसावल्यानंतर पावले समोरच्या पटांगणात उभारण्यात आलेले पाळणे, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे वळली. येथे लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनीही यात्रेचा यथेच्छ आनंद लुटला. परत निघताना परिसरात मांडण्यात आलेले गृहोपयोगी साहित्य, लहान मुलांचे खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, पोस्टर्सची खरेदी करण्यात आली.
मंदिर समितीने केले नेटके नियोजन
मंदिर समितीने केलेल्या नेटक्या नियोजनामुले केवळ भाविकांनाच नव्हे तर या मार्गावरून जाणाºया अन्य वाहतुकीलाही अडचणींचा सामना करावा लागला नाही. मंदिराजवळ दर्शन रांग आली की भाविकांना आपले नैवेद्य काढण्यासाठी टेबलची सोय करण्यात आली होती. मंदिरात येणारे अन्य मार्ग बॅरिकेटस व मांडव उभारून बंद करण्यात आले होते.
एकदा आत आलेला भाविक रेणुकादेवी, परशुराम, मातंगी देवीया क्रमाने दर्शन घेवूनच बाहेर पडत होता. मागील मैदानात कापूर व उदबत्ती लावण्यासाठी तसेच नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली होती.
मुख्य चौकातील रस्ता वाहनधारकांसाठीही खूला ठेवून त्याच्या अन्य दोन्ही बाजूंना स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा आला नाही. या सगळ््या नियोजनासाठी अरुण बारामती, विजय पाटील, प्रसाद उगवे, सुनिल मेढे यांच्यासह ८० कार्यकर्ते राबत होते.