कृषी कायदे, वीज विधेयके रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:57+5:302021-03-27T04:23:57+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून ...
कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून तिच्या माथ्यावर लादण्याचा सपाटा लावला आहे. त्याला शेतकरी, शेतमजूर, संघटित, असंघटित कामगारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे कृषी कायदे, वीज विधयके आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.
जनतेच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने हे मंजूर केलेले कायदे आणि प्रस्तावित विधेयके त्वरित मागे घ्यावीत. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती सरकार कराचे ओझे लादत असल्याने सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने अवाजवी कर रद्द करून वरील इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे या समितीच्या शिष्टमंडळाने केली. त्यामध्ये उदय नारकर (अखिल भारतीय किसान सभा), नामदेव गावडे (महाराष्ट्र राज्य किसान सभा), वसंतराव पाटील (जनता दल (धर्मनिरपेक्ष), एस. बी. पाटील (आयटक), प्रा. सुभाष जाधव (सीटू), रवींद्र जाधव (जनता दल (धर्मनिरपेक्ष), सतीशचंद्र कांबळे (भाकप), शंकर काटाळे (माकप), अनंतराव कुलकर्णी (सर्व श्रमिक संघ), बाबूराव कदम (शेकाप), दिलदार मुजावर (एआयवायएफ), बाबा मिठारी, शिवाजी पाटील, अनिल चव्हाण, आदींचा समावेश होता. दरम्यान, या समितीने केलेल्या व्यवहार बंदच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद लाभला.
चौकट
बिंदू चौकात उद्या विधेयकांची होळी
या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही शुक्रवारी रॅलीचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती रद्द केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे उदय नारकर यांनी सांगितले. बिंदू चौकात आम्ही सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळेत धरणे आंदोलनाद्वारे विरोध दर्शविला. व्यवहार बंद ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. समितीच्या वतीने रविवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकात प्रस्तावित कृषी कायदे, वीज विधयके, चार कामगार संहितेची प्रतिकात्मक होळी करून निषेध केला जाणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.
फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.
===Photopath===
260321\26kol_2_26032021_5.jpg
===Caption===
फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.